राज्य शासनाच्या महाज्योती या विशेष विभागामार्फत युवांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत. महाज्योतीमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जेईई, नीट, सीईटी, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जात असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाज्योतीचे ५६६ उमेदवार यशस्वी झाले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच महाज्योती या संस्थेची निर्मिती राज्य शासनाने एकूणच राज्यातील स्पर्धात्मक परिक्षा देणारे विद्यार्थी, कौशल्य रोजगारअंतर्गत काम करणारे विद्यार्थी तसेच पीएचडी संशोधन, व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी केलेली आहे. या माध्यमातून प्रशिक्षण, अनुदान यांची व्यवस्था केलेली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का निकालामध्ये वाढला आहे.
जेईई/नीट/एमएचटी-सीईटी यांच्यासह यूपीएससी-एमपीएससी, आयबीपीएस पी ओ-एलआयसी-एएओ या सारख्या स्पर्धा परीक्षांचे पूर्वप्रशिक्षण दिले जाते. सैन्य व पोलिस भरतीचे पूर्वप्रशिक्षण उमेदवारांना मिळते. एमबीए-कैंट/सीएमएटी-सीईटी, यूजीसी-सीएसआयआर-नेट-सेट परीक्षेचे घडे देण्यात येतात. यूपीएससी- एमपीएससी मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी अर्थसहाय्य केले जाते. पी. एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप व व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण असे विविध उपक्रम सध्या महाज्योतीच्या माध्यमातून राबवले जातात.
महाज्योतीची कार्ये
-महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करणे.
-स्पर्धा परीक्षा, रोजगार, स्वयंरोजगार, आयोजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण राबविणे,
-महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबीचे संशोधन करणे
– ज्ञान बॅँक, डेटा बँकेची उभारणी करणे
-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, फेलोशिप व अनुदान, अर्थसहाय्य देणे आदी.
विविध परिक्षांत यशोगाथा
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाज्योतीचे ५६६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यात १४२ विद्यार्थी यूपीएससी पूर्व तर १२ विद्यार्थी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. भारतीय वनसेवेत २२ उमेदवारांची निवड झाली आहे. एमपीएससी पूर्वपरीक्षेत १५४ तर मुख्य परीक्षेत २२ जणांनी बाजी मारली आहे. ६१ उमेदवारांनी पोलिस उपनिरीक्षक आणि प्रत्येकी २० उमेदवारांनी एसटीआय आणि विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. २१ उमेदवार बँकींग परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
प्रशिक्षणार्थींची संख्या वाढतेय
मागील तीन वर्षांत जेईई/नीट / एमएचटी-सीईटी तयारी करणाऱ्या विज्ञान शाखेच्या २२,२२६ विद्यार्थ्यांना पूर्वप्रशिक्षण दिले होते. २०२१ व २०२२ वर्षांत २२५६ उमेदवारांनी यूपीएससी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. २०२३ मध्ये ३००० विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र झाले आहेत. आयबीपीएस-पीओ-एलआयसी एएओसाठी ५८५, यूजीसी सीएसआयआर-नेट-सेटसाठी १२००, यूपीएससी व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी १२ तर मुख्य परीक्षेसाठी ३४२ उमेदवार तर एमपीएससीसाठी १५०० उमेदवार लाभ घेत आहेत. पोलिस भरतीसाठी ५५४ तर सैन्य भरतीसाठी ७४१ पात्र उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हेही वाचा –
- मिशन ४०० पार साठी PM मोदी मैदानात; आज कर्नाटक, तेलंगणात करणार वादळी प्रचार
- Nashik News : वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या
- Nashik News : वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या
The post महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का appeared first on पुढारी.