महापालिका उभारणार दादासाहेब फाळके यांचा पुतळा; पाच कोटी रुपयांची तरतुद

नाशिक : महापालिकेच्या वतीने भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा फाळके स्मारकामध्ये पूर्णाकृती पुतळा उभारणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. पुतळ्यासाठी अंदाजपत्रकात पाच कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

पूर्णाकृती पुतळा व सुशोभिकरण करण्याचे निर्देश

दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा पाया रचून देशाला चित्रपटसृष्टीची ओळख करून दिल्याने जगात बॉलिवूड दुसऱ्या क्रमांकाची चित्रपटसृष्टी तयार झाली. दादासाहेबांची कर्मभूमी नाशिक आहे. त्यांचे नाव चिरंतर स्मरणात राहाण्यासाठी महापालिकेने पांडवलेण्याच्या पायथ्याशी १७ एकर जागेत स्मारक उभारले आहे. सध्या स्मारकाला अवकळा प्राप्त झाली आहे. महापौर कुलकर्णी यांनी फेब्रुवारी महिन्यात स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी स्मारकाचे पर्यटनस्थळात रूपांतर करण्याचे आश्‍वासन दिले होते. स्मारकात दादासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या सूचना दिल्या.

बौद्ध स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दहा कोटी

यंदाच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात पूर्णाकृती पुतळ्यासाठी पाच कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करण्यात आली. स्मारकाबरोबरच बौद्ध स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दहा कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षातच पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी नाट्यकर्मी, तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित कलाकारांकडून सातत्याने होत असल्याने महापौर कुलकर्णी यांनी आज महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जन्मशताब्दी वर्षातच पूर्णाकृती पुतळा व सुशोभिकरण करण्याचे निर्देश दिले.

दादासाहेब फाळके यांचा पूर्णाकृती पुतळा व फाळके व बौद्ध स्मारकाचे सुशोभिकरण झाल्यास पर्यटनस्थळ म्हणून हा भाग विकसित होईल. - सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची