महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात; महापालिकेचा कुठलाही कर थकीत न ठेवण्याचे आवाहन

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर प्रशासनाने जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने मालमत्ता, पाणीपट्टी, तसेच महापालिकेच्या जागा भाडेतत्त्वावर घेतल्या असल्यास मुदतीच्या आत भरणा न केल्यास वेतनातून कपात करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. 

मालमत्ता, पाणीपट्टी अदा करण्याच्या आयुक्तांच्या सूचना 
गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये प्रशासनाने घरपट्टीतून १३० कोटी, तर पाणीपट्टीतून ८५ कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाले. या कालावधीत अनेकांना रोजगाराला मुकावे लागल्याने त्याचा परिणाम महसूल वसुलीवर झाला. विविध कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी दंडात्मक कारवाईमध्ये सूट देताना अभय योजना लागू केली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यात सुधारित अंदाजपत्रक सादर करताना २० कोटी रुपयांची वाढ मालमत्ता करवसुलीत करण्यात आली. मार्च महिन्यापर्यंत उद्दिष्ट गाठायचे असल्याने सद्यःस्थितीत अवघड आव्हाने पेलणे कठीण दिसत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना घरपट्टी, पाणीपट्टी किंवा महापालिकेचा कुठलाही कर थकीत न ठेवण्याचे आवाहन करून विभागप्रमुखांना वसुलीचे आदेश दिले आहेत. ज्या कर्मचऱ्यांनी मुदतीमध्ये कर अदा केले असतील, त्यांनी छायांकित प्रत विभागप्रमुखांना द्यावी. जे कर्मचारी कर भरणा करणार नाहीत, त्यांच्या वेतनातून कराची कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

\हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कर वसुलीसाठी उपाययोजना 
विविध कर विभागाला मालमत्ता करवसुलीचे १५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ९६.८८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. विभागनिहाय सातपूर विभागात १०.७५ कोटी, पश्‍चिम विभागात २०.६२ कोटी, पूर्व विभागात १७.३५ कोटी, पंचवटी विभागात १५.८७ कोटी, सिडको विभागात १६.७४ कोटी, नाशिक रोड विभागात १५.५२ कोटी रुपये याप्रमाणे मालमत्ता कराची वसुली आहे. त्यामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाय योजले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेचे कर भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार सूचना दिल्या आहेत अन्यथा वेतनातून कपात केली जाईल. -कैलास जाधव, आयुक्त, महापालिका