महापालिका निवडणुकांना शासनाची स्थगिती! सभापतीचे स्वप्न अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर 

नाशिक : कोरोना संसर्गामुळे गर्दी करण्यावर बंदी असल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेच्या पोटनिवडणुका, प्रभाग समिती, स्‍थायी समिती, तसेच अन्य विषय समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती.

गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रभाग चारमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. मार्चमध्ये पंचवटी, नाशिक रोड, सिडको, पश्‍चिम, पूर्व व सातपूर प्रभाग समिती सभापतिपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली होती. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाच्या नगरविकास विभागाचे अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे पत्र विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नगर परिषद व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना पाठवले आहे.

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून, वाढती रुग्णसंख्या, आरोग्य सुविधांवर निर्माण झालेला ताण यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत समितीमधील विषय समिती, स्थायी समिती सभापती व सदस्य निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण पत्रात देण्यात आले. एक महिन्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

स्वप्नांचा चुराडा 

यंदाच्या पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समितीसह विविध विषय समित्या व सहा प्रभाग समित्यांचे सभापती होण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. सर्वच पक्षांच्या वरिष्ठांकडून शब्द मिळविल्यानंतर एप्रिलमध्ये सभापती पदावर विराजमान होण्याचे अनेकांचे स्वप्न शासनाच्या निर्णयामुळे लांबणीवर पडले आहे.