महापालिका मुख्यालयात परवानगीशिवाय प्रवेश नाही! अंमलबजावणीस आजपासून सुरवात 

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिका मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. मुख्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी कोरोनाच्‍या विळख्यात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्‍त कैलास जाधव यांनी मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्‍या प्रवेशावर मर्यादा आणल्‍या आहेत. यासंदर्भात जारी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी शुक्रवार (ता. २६) पासून सुरू झाली आहे. 

महापालिका मुख्यालयात येणारे अभ्यागत व त्‍यांच्‍या सोबत येणाऱ्या कोविड १९ संक्रमित व्‍यक्‍ती यांच्‍यापासून मुख्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका आहे. प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून निर्देश जारी करत असल्‍याचे आयुक्‍त  जाधव यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

ओळखपत्र पाहून प्रवेश

या आदेशानुसार मुख्यालयात कामावर उपस्‍थित राहाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्‍या प्रवेशासाठी अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. बैठकींसाठी येणारे निमंत्रित अथवा कामानिमित्त विविध अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या अभ्यागतांना संबंधिताच्‍या किंवा स्‍वीय सहाय्यकाच्‍या‍ लेखी निर्देशाशिवाय प्रवेश देऊ नये. लेखी निर्देश प्राप्त व्‍यक्‍तींसोबत अनावश्‍यक सोबतींना प्रवेश नाकारण्यात यावा. विभागप्रमुखांनी कामकाजाच्‍या अनुषंगाने बाहेरील कोणत्‍याही व्‍यक्‍तीस कार्यालयात बोलविल्‍यास तसे सूचनापत्र प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांना द्यावे. दिवसभरातील प्रवेश दिलेल्‍या अभ्यागतांचा सर्व सूचनापत्रांसह अहवाल रोज सायंकाळी उपायुक्‍त (प्रशासन) यांच्‍याकडे द्यावा, असे आयुक्‍तांनी जारी केलेल्‍या निर्देशात म्‍हटले आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ