महापालिका मुख्यालयात मॉनिटरिंग सिस्टिम;कोरोना पार्श्‍वभूमीवर यंत्रणा

नाशिक : मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या महापालिका मुख्यालयात रोज हजारो नागरिक व कर्मचारी येत असतात. परंतु सॅनिटायझर किंवा अन्य सेवा पुरविताना अडचण निर्माण होत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथील खासगी कंपनीच्या सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) मॉनिटरिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. 

बायोमेट्रिक हजेरी मशिन बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींसोबत फक्त तीन लोकांना मुख्यालयात प्रवेश दिला जात आहे, तर विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय मुख्यालयात प्रवेश दिला जात नाही. मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वारातूनच फक्त प्रवेश दिला जातो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बायोमेट्रिक हजेरी मशिन बंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद रजिस्टरमध्ये घेतली जाते. त्यामुळे नियंत्रण राहत नसल्याने महापालिकेने स्वयंचलित मॉनिटरिंग यंत्रणा मुख्य प्रवेशद्वारावर बसविली आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

अशी आहे यंत्रणा 
मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मॉनिटरिंग मशिनमधूनच जावे लागणार आहे. यंत्रावर स्कॅनिंग मशिन बसविण्यात आले आहे. तोंडावर मास्क असेल तरच स्कॅनिंग होते. स्कॅनिंग झाल्यानंतर शरीरातील तापमानाची नोंद होते. स्वयंचलित पद्धतीने तपासणी झाल्यानंतर नियमात असेल तरच यंत्राचे बॅरिकेड्स खुले होतात; अन्यथा प्रवेश मिळत नाही. महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटोदेखील स्कॅन होणार असल्याने हजेरीची नोंदही होणार आहे.

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर