महापालिका मुख्यालय आग दुर्घटना : इलेक्ट्रिकल ऑडिट न झाल्याने विद्युत विभाग रडारवर 

नाशिक : महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनला लागलेली आग अग्निशमन विभाग व विद्युत विभागामधील वादाला कारणीभूत ठरताना दिसत आहे. अग्निशमन विभागाने दोन महिन्यांपूर्वी फायर ऑडिट केल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता इलेक्ट्रिकल ऑडिटचा मुद्दा समोर आला असून, महापालिका इमारतीचे इलेक्ट्रिकल ऑडिट झाले नसल्याने हा विभाग आता रडारवर आला आहे. 

दोन महिन्यांपूर्वी फायर ऑडिट

महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (ता. २३) विरोधी पक्षनेत्यांच्या केबिनला लागून असलेल्या स्टोअर रूममधील स्वीच बोर्डात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. सुरवातीला किरकोळ स्वरूपात असलेली आग प्लायवूड, सोफासेटमुळे भडकत गेली. अर्धा तासात आग विझविण्यात यश आल्यानंतर घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. समितीमध्ये शहर अभियंता संजय घुगे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांचा समावेश आहे. महापालिका इमारतीचे दोन महिन्यांपूर्वी फायर ऑडिट करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग चौकशीतून सहीसलामत सुटण्याची शक्यता आहे. परंतु महापालिका इमारतीचे इलेक्ट्रिकल ऑडिट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

ऑडिट वर्षातून एकदा गरजेचे 

महापालिका मुख्यालयाची इमारत राज्यातील सुरक्षित इमारतींपैकी एक आहे. परंतु शासन नियमाप्रमाणे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट वर्षातून एकदा करणे गरजेचे आहे. दोन महिन्यांपूर्वी फायर ऑडिट करण्यात आले. परंतु इलेक्ट्रिकल ऑडिट अद्यापही झालेले नाही. फायर ऑडिटमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, हे तपासले जाते. नादुरुस्त असल्यास दुरुस्ती केली जाते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल साहित्य जसे वायर, इलेक्ट्रिकल ट्रान्स्फॉर्मर, फ्यूज आदींची तपासणी केली जाते. नादुरुस्त असल्याने ते बदलले जातात. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जात असल्याने विद्युत विभाग आता रडावर येणार आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या