महापालिका यंत्रणा हादरली! मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २८ कर्मचारी बाधित

नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्‍या महापालिकेच्या वैद्यकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वैद्यकीय विभागाचे ढिसाळ नियोजन, वेळीच गांभीर्य न ओळखल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. 
विशेष म्हणजे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सहाय्यकासह विविध विभागांतील पंचवीसहून अधिकारी बाधित असल्याच्या चर्चेने एरवी दुपारी चारनंतर गजबजणाऱ्या राजीव गांधी भवनात गुरुवारी (ता.२५) शुकशुकाट होता. 

महापालिका वैद्यकीय विभागात कोरोनाचा शिरकाव 

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्या तरी उपययोजना तोकड्या ठरत आहेत. इतक्या गतीने रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या सगळ्यावर तब्बल वर्षापासून नियंत्रण ठेवून असलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २८ कर्मचारी बाधित

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकारी याशिवाय इतर विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी अशा साधारण २५ ते ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि दोन मुख्य सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनाही कोरोनाची लागण झाली असून, याशिवाय कर्मचाऱ्यांसह अधिकारीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

महापालिकेत शुकशुकाट 
महापालिकेच्या राजीव गांधी भवनात रोज दुपारी चारनंतर कामकाजाला गती येते. दिवसभर फील्डवर जाणारे अधिकारी, तसेच नगरसेवक, ठेकेदार, दुपारनंतर कामकाजासाठी येणारे अभ्यागत अशा सगळ्यांच्या येण्यामुळे दुपारी चारनंतर महापालिकेच्या कार्यालयातील लगबग वाढते. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या वृत्ताने महापालिकेच्या कामकाजावर, दैनंदिन वर्दळीवर त्याचा प्रभाव झाला आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम दिसला. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कोरोनाच्या शिरकावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

ना अहवाल, ना झोन 
दरम्यान, कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवालाच्या प्रतीक्षेचा प्रश्न आजही कायम आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३० टक्क्यांच्या आसपास पोचले आहे. नेमके अशाच वेळेत अहवाल मिळत नसल्याने पॉझिटिव्ह अहवाल हातात पडेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णही मोकळे फिरत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत महिन्यापूर्वी महापालिकेच्या कंटेन्मेंट झोनबाबत उदासीनता असल्याची तक्रार झाली होती. पण १५ दिवस होऊनही त्यात विशेष फरक पडलेला नाही. शहरात रुग्णसंख्या वाढत असतानाही कंटेन्मेंट झोन प्रतिबंधित करण्याबाबत मात्र कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने सामन्य नागरिकांसोबत दस्तुरखुद्द महापालिका यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात सापडत चालली आहे.