महापालिका शाळा इमारतींचे होणार सर्वेक्षण; विद्यार्थी सुरक्षेसाठी निर्णय 

नाशिक : आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पूर्ण क्षमेतेने महापालिकेच्या शाळा सुरु होणार असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर शाळा इमारतींची सुरक्षा तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी सोमवारी (ता.२५) विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या. 

राज्य शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापूर्वी शाळा इमारतीची सुरक्षितता महत्त्वाची असल्याची बाब स्थायी समितीमध्ये सदस्य राहुल दिवे यांनी मांडली. गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने इमारतींची दुरवस्था झाली आहे. शाळा आवारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्याच्या टाक्यांमध्ये देखील घाण झाल्या आहेत. शाळा इमारतींचे दरवाजे खिडक्या, बेंचेस नादुरुस्त झाले आहेत. एकीकडे कोरोनाशी दोन हात करताना दुसरीकडे अन्य आजाराने विद्यार्थी आजारी पडू नये, यासाठी शिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय अधिकारी महापालिकेच्या ७७ शाळा इमारतींची पाहणी करणार आहे. 
 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

५८७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ 

कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असला तरी वैद्यकीय विभागाने कोविड सेंटरमध्ये नियुक्त ९६ डॉक्टर व ५८७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, मेरी व समाजकल्याण वसतिगृह तसेच ठक्कर डोम येथे कोविड सेंटर उभारले होते. रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन फिजिशियन, ८६ आयुष वैद्यकीय अधिकारी, २ मायक्रोबायोलॉजिस्ट, ४ रेडिओग्राफर व १ एमबीबीएस डॉक्टर व ५८७ वैद्यकीय कर्मचारी मानधनावर नियुक्त केले होते. त्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्याचबरोबर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने डॉक्टर भरतीबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. त्यासाठी खरेदी केलेल्या ऑक्सिजन टाक्या मविप्र रुग्णालयाला विनामोबदला वापरण्यासाठी दिल्याने त्या परत घेण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क