महापालिकेकडून बेफिकीर नाशिककरांवर कारवाईचा बडगा कायम; सव्वा लाखांचा दंड वसूल 

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मास्क न वापरणाऱ्यांवर सुरू केलेल्या कारवाईचा दांडपट्टा मंगळवारी (ता. २३)ही चालविला. दिवसभरात तब्बल १२७ लोकांवर कारवाई करून प्रतिव्यक्ती एक हजार रुपयांप्रमाणे एक लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. शुक्रवार (ता. १९)पासून सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत ५७३ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. 

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय असल्याचे वारंवार सांगूनही नागरिकांकडून दखल घेतली जात नसल्याने महापालिकेने दंडात्मक कारवाई अधिक कठीण केली आहे. दहा महिन्यांत नऊ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. शुक्रवारपासून कारवाईची व्याप्ती वाढविण्यात आली. चार दिवस मास्क न वापरणाऱ्यांकडून प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रतिव्यक्ती एक हजार रुपये दंड आकारणी सुरू झाली आहे. विभागनिहाय भरारी पथकांची नियुक्ती केली असून, पोलिसांसह महसूल विभागाचे तलाठ्यांनाही दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. मंगळवारी दिवसभरात १२७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पाच दिवसांत ५७३ विनामास्क नागरिकांकडून दोन लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

विभागनिहाय दंड वसुली 
विभाग व्यक्ती दंड 
नाशिक रोड २९ २९ हजार रुपये 
पश्चिम ११ ११ हजार 
पूर्व ४५ ४५ हजार 
सिडको ११ ११ हजार 
पंचवटी १६ १६ हजार 
सातपूर १५ १५ हजार 
------------------------------------------------- 
एकूण १२७ एक लाख २७ हजार 
------------------------------------------------- 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले