महापालिकेची बाजारातील पत घसरली! क्रिसिलचा अहवाल, उत्पन्न घटण्याबरोबरच दायित्वात वाढ 

नाशिक  : क्रिसिलच्या आर्थिक सर्वेक्षणात महापालिकेला एए मायनस असे रेटींग देण्यात आल्याने विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. कोविडमुळे घटलेले उत्पन्न व विकासकामांचे सोळाशे कोटी रुपयांच्या वर पोहोचलेल्या दायित्वामुळे रेटींग घसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पुढील आर्थिक वर्षात रेटींग सुधारण्याचा दावा केला जात आहे. 

काय फरक पडतो..

महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन रेटींग ठरविण्यासाठी महापालिकेने क्रिसिल या संस्थेची नियुक्ती केली आहे. प्रकल्पांची अंमलबजावणी व आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन संस्थेच्या वतीने रेटींग दिले जाते. ए प्लस प्लस, ए प्लस, ए मायनस, ए ए मानयस, बी प्लस, बी बी मायनस, सी सी मायनस असे रेटींगचे प्रकार आहेत. ए प्लस प्लस रेटींग मिळाल्यास महापालिकेची बाजारातील पत सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. त्या आधारे वित्त संस्था कर्ज देण्यासाठी पुढे येतात.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कसे निश्चित होते हे रेटींग

२०१४ मध्ये महापालिकेला प्रकल्प अंमलबजावणीचे ए ए मायनस व आर्थिक स्थितीचे ए फ्लस रेटींग क्रिसिलकडून देण्यात आले होते. आर्थिक स्थितीचे रेटींग चांगले असल्याने महापालिकेला सिंहस्थाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ११० कोटींचे कर्ज मिळाले होते. २०१८ मध्ये गरज नसलेली कामे रद्द केल्याने तो निधी कर्ज परतफेडीसाठी वळविल्याने महापालिका कर्जमुक्त झाली होती. परंतु, सध्या सत्ताधारी भाजपकडून कर्ज काढण्यासाठी हट्ट धरला जात आहे. कर्जाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास तत्काळ कर्ज उपलब्ध होत नाही त्यासाठी रेटींग निश्‍चिती प्रमाणपत्राची आवशक्यता असते. ऐनवेळी धावपळ नको म्हणून लेखा विभागाने रेटींग ठरविण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेतला होता. क्रिसिलने सध्या सुरु असलेले प्रकल्प, अंमलबजावणी, निधीची उपलब्धता, प्रकल्पांवरचा नियोजित व खर्च झालेला निधी याचा अभ्यास करून रेटींग निश्‍चित केले. यात एए मायनस असे मध्यम स्वरुपाचे कार्पोरेट रेटींग देण्यात आले आहे. रेटींग अति खालावले नसल्याची सुखावह बाब असली तरी ए प्लस रेटिंग प्राप्त करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

दायित्व सोळाशे कोटींवर 

सन २०१४ मध्ये पालिकेला कार्पोरेट रेटींग एए मायनस मिळाले होते. परंतु, त्यावेळी तीनशे कोटी रुपयांचे दायित्व होते. नव्या सर्वेक्षणात पूर्वी प्रमाणेच रेटींग मिळाले असले तरी भांडवली कामांच्या दायित्वाचा भार सोळाशे कोटी रुपयांच्यावर पोहोचला आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ साधताना उत्पन्नावर पुढील वर्षात अधिक भर द्यावा लागणार आहे.