महापालिकेचे अंदाजपत्रक २ हजार कोटींच्या पुढे; विकासकामांसाठी निधी मिळण्याची नगरसेवकांना अपेक्षा 

नाशिक : गेल्या वर्षी कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. १६) प्रशासनातर्फे स्थायी समितीसमोर २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर होणार आहे.

यंदाच्या अंदाजपत्रकात दरवाढ होणार नसल्याचे संकेत यापूर्वीच दिले असले, तरी भूसंपादनासाठी २०० कोटी, शहर बससेवेसाठी ८० कोटी, तर गोदावरी स्वच्छता, नवीन बिटको रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर, स्मार्ट स्कूल योजनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याने नगरसेवकांना विकासासाठी भरघोस निधी मिळण्याची अपेक्षा आहे. 

 तारेवरची कसरत होणार

नियमानुसार महापालिकेचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीच्या आत प्रशासनाला स्थायी समितीसमोर ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, मंगळवारी आयुक्त कैलास जाधव यांच्यातर्फे स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक ठेवले जाणार आहे. यंदाचे अंदाजपत्रक दोन हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने स्थायीचा भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर करताना तारेवरची कसरत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी अपेक्षित उत्पन्न महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे या दोन्ही महत्त्वपूर्ण योजनांचे खासगीकरण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

हे वर्ष नगरसेवकांसाठी विकासकामांचे

शासनाने नवीन डीसीपीआर मंजूर केल्याने या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण झाले आहे. त्याचाही लाभ उत्पन्नाची बाजू भक्कम करताना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पन्नाची बाजू भक्कम करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी दुसरीकडे त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलासाठी होणारी मोठी आर्थिक तरतूद, भूसंपादन, दादासाहेब फाळके स्मारकाचे नूतनीकरण, शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला द्यावी लागणारी रक्कम, मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास त्यासाठी महापालिकेला द्यावा लागणाऱ्या आर्थिक वाट्यामुळे खर्चाचा भार अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. २०२२ मध्ये महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष नगरसेवकांसाठी विकासकामांचे ठरणार आहे. नगरसेवकांना किमान एका प्रभागासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी हवा आहे. प्रशासन नगरसेवकांची मागणी मान्य करते का, हे पाहणे अंदाजपत्रकात महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीवेळी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. दत्तक घोषणेनुसार मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर शहर बससेवा, उड्डाणपूल आदी महत्त्वपूर्ण कामे या वर्षी करायची आहेत. त्याचबरोबर नगरसेवकांना भरघोस निधी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. 
-गणेश गिते, सभापती, स्थायी समिती