महापालिकेचे गाळे अन् वापराविना लागले टाळे! लाखो रुपयांचा खर्च वाया

म्हसरूळ (नाशिक) : गोदाघाटावर भाविक आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने व्यावसायिकांसाठी उभारलेल्या गाळ्यांपैकी काही गाळे वापराविना धूळखात आहेत. यामुळे महापालिकेच्या उद्देशाला हरताळ फासला गेला असून, लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. अडगळीच्या वस्तू फेकण्यासाठीच गाळ्यांचा उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. 

लाखो रुपयांचा खर्च वाया; अडगळीच्या वस्तू फेकण्यासाठी वापर 
पंचवटीसारख्या धार्मिक, पर्यटनस्थळाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गाळे संकुलात टपाल कार्यालयवगळता इतर सर्व गाळे वापराविना आहेत. या संकुलाचा तळमजला खास पार्किंगसाठी सोडला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर गाळे काढले आहेत. यातील काही गाळ्यांचे शटर कायम अर्धवट उघडे असते. काचेच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. येथील टपाल कार्यालयात येणाऱ्यांची वाहने पार्किंगच्या जागेत उभी करणे अवघड होते. याच पार्किंगच्या जागेत इतर वाहने उभी केली जातात. तसेच कपड्यांच्या गाठोड्यांचा ढिगारा येथे पडलेला असतो. येथे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा अडथळा पार करून जावे लागते. गंगाघाटाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या या संकुलाच्या बाजूला म्हसोबा पटांगण असून, या भागात नाशिकच्या धार्मिक तीर्थस्नानावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाहने थांबतात. त्यामुळे येथे अनेक व्यवसाय होऊ शकतील, अशा उद्देशाने संकुल उभारले असले, तरी व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते गाळे पडून आहेत. 

पालिका बाजारही वापराविना पडून

पेठ रोडला पालिका बाजारही असाच रस्त्यालगतच्या भागात असूनही तेथील व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या झोपडपट्टीच्या परिसरात राहणारा वर्ग त्याच्याकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू यांना मर्यादा असल्यामुळे कमी दराचे भाडे असलेले गाळे मिळत नाहीत. गाळ्यांचे भाड्याचे दर परवडत नसल्यामुळे येथील व्यावसायिकांनी गाळे सोडून दिल्यामुळे हा पालिका बाजारही वापराविना पडून असल्याने तेथे अडगळीचे साहित्य टाकण्यात येत असल्याचे दिसते.