
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दिंडोरी रोडवर ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या कचर्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाच्या ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ या घोषणेलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
दिंडोरी रोडवर मायको दवाखाना चौफुली ते पाटापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कचर्याचे ढीग साचत आहेत. याच मार्गावरील महावितरण कार्यालयाबाहेर परिसरातील रहिवासी सर्रासपणे कचरा फेकतात. सकाळी एकदा महापालिकेची घंटागाडी येथील कचरा उचलून नेते. त्यानंतर मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’च निर्माण होत असून, हे ठिकाण कचर्याचे ब्लॅकस्पॉट झाले आहे. नागरिकांनी फेकलेल्या कचर्याभोवती मोकाट जनावरे तसेच डुकरे जमा होतात. परिणामी या भागातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाटाजवळील परिस्थिती वेगळी नाही. गेल्या काही वर्षांपासून हा पाट म्हणजे कचर्याचे आगार झाले आहे. दिंडोरी रोडवर दोन्ही बाजूंकडील वसाहतींमधून थेट पाटामध्ये कचरा फेकला जात आहे. परिणामी तेथे डासांची व अन्य कीटकांची उत्पत्ती होत आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने या सर्व बाबींकडे डोळेझाक केली आहे. परिणामी या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचवेळी येथून मार्गक्रमण करणार्या वाहनचालकांनाही नाकाला रूमाल लावून जावे लागत आहे.


हागणदारीमुक्त शहर कागदावर
दिंडोरी रोडवर पाटालगत महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, तरीही परिसरातील बहुतांश नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळ्या असलेल्या मेरीच्या मैदानात शौचास जातात. त्यामुळे महापालिकेकडून शहर हागणदारीमुक्तीचा दावा केवळ कागदावरच उरतो आहे.
मोकाट जनावरे डोकेदुखी
मायको सर्कल ते मेरीच्या कार्यालयापर्यंत रस्त्यातच मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. कधी-कधी या जनावरांमध्ये झुंजीदेखील लागतात. परिणामी रस्त्यावरून जाणार्या वाहनधारकांना त्यांचा जीव मुठीत धरून या भागातून जावे लागते. रात्रीच्या वेळी येथील मोकाट कुत्रे वाहनधारकांच्या मागे धावत भुंकत असल्याने अनेक दुचाकीस्वार पडून अपघाताच्याही घटना घडल्या आहेत.
हेही वाचा:
- नाशिक : नैसर्गिक नाल्यांची माहिती आयुक्तांनी पुन्हा मागवली
- पिंपरी : महापालिका शाळेत मोठे बदल करणार; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
- पिंपरी : पोलिसांसमोर हाणामारी; पाच जणांवर गुन्हा
The post महापालिकेचे दुर्लक्ष : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ घोषणेला हरताळ appeared first on पुढारी.