महापालिकेच्या अंदाजपत्रकात साडेतीनशे कोटींची तुटीची शक्यता; प्रकल्प येणार अडचणीत

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने चालू अंदाजपत्रकात सुमारे साडेतीनशे कोटींची तूट निर्माण होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन पुढील आर्थिक वर्षासाठी चालू आर्थिक वर्षाइतकेच जेमतेम अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. दर वर्षी उत्पन्नात गृहीत धरण्यात आलेली दहा टक्के वाढ यंदा रद्द करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. 

महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम

२०२०-२१ या आर्थिक वर्षाचे २१६१. ७९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आले होते. स्थायी समितीने विविध योजनांचा समावेश करताना २२८. ५५ कोटी रुपयांची वाढ सुचवत २३९०.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर महासभेने साधारण अडीचशे कोटी रुपयांची वाढ केली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. 

दहा टक्के वाढ रद्दचा निर्णय 

जीएसटीचे ९८४ कोटी, तर घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर व विकास शुल्काच्या माध्यमातून साडेचारशे कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज धरण्यात आला होता. परंतु कोरोनामुळे आर्थिक गणिते बिघडल्याने पालिकेच्या वसुलीवरही गंभीर परिणाम झाला. आता २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर उत्पन्नात साडेतीनशे कोटी रुपयांची घट निर्माण झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आल्याने पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना दर वर्षी दहा टक्के गृहीत धरली जाणारी वाढ यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रकल्प येणार अडचणीत 

द्वारका येथील महापालिकेच्या जागेवर पूर्व विभागाचे कार्यालय, होळकर पूल ते सोमेश्वरपर्यंत बोटक्‍लब, जुने नाशिक कत्तलखान्याचे नूतनीकरण, सुरतच्या धर्तीवर आडगाव ट्रक टर्मिनसमध्ये मार्केट, जाहिरात फलकांची उभारणी, पुण्याच्या धर्तीवर ओला कचरा खतनिर्मिती प्रकल्प, प्रगती मैदानाच्या धर्तीवर निलगिरी बागेत क्रीडांगण, मळे परिसरातील मलवाहिकांसाठी एक कोटी, महिला स्वच्छतागृहे, स्मार्ट शाळा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना कात्री लागणार आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

नव्या मिळकतींना घरपट्टी 

पुढील वर्षात उत्पन्नात वाढ करण्यासाठी थकबाकी वसुल केली जाणार आहे. नवीन मिळकतींना घरपट्टी लागू करण्यासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिकेचे गाळे, मिळकती भाड्याने देण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच