महापालिकेच्या बसचे भाडे एसटीच्या निम्मे; कोव्हीडच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय 

नाशिक : जानेवारी महिन्यापासून सुरु होणाया शहर बससेवेचे भाडे चार किलोमीटरला पाच रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेच्या तुलनेत कमी दर राहणार असल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान बससेवा सुरु करण्यापुर्वी प्रायोगिक तत्वावर काही प्रमाणात सेवा सुरु करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. २६ जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने नियमित सेवा सुरु होईल. 

महापालिकेच्या बसचे भाडे एसटीच्या निम्मे

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याचे कारण देत चालविण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने बससेवा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. ग्रॉस कॉस्ट कटींग या तत्वानुसार पहिल्या टप्प्यात अडिचशे बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. बससेवेसाठी महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून बस पुरविण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक व वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. तिकीट वसुली ठेकेदारमार्फत केली जाणार असून किलोमीटर मागे बस ऑपरेटर कंपन्यांना ठरविक रक्कम अदा केली जाणार आहे. १०० सीएनजी, १०० डिझेल तर ५० ईलेक्ट्रॉनिक बसेस चालविल्या जाणार आहेत. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

कोव्हीडच्या पार्श्‍वभूमीवर कमी दर 
राज्य परिवहन महामंडळा मार्फत सध्या चार किलोमीटरला दहा रुपये असा प्रवासी दर निश्‍चित करण्यात आला आहे. मात्र कोव्हीड स्थिती व प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेच्या बससेवेचे दर चार किलोमीटरला पाच रुपये ठेवले जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळापेक्षा निम्म्याने हे दर राहतील. बससेवा सुरु करण्यासाठी पायाभुत सुविधा, नियंत्रक, परिवहन सेलची नियुक्ती, बससेवे साठी ऑडीटर नियुक्त करणे, शासनाकडून तिकीटांचे दर निश्‍चित करणे, आरटीओ कडून परमिट मिळविणे, बस डेपो यासंदर्भात सर्व परवानग्या ३१ डिसेंबरच्या आत घेतल्या जाणार असून २६ जानेवारी पासून सेवा सुरु करण्याचे प्रयत्न राहणार आहेत. बसेसवर जाहीराती, ईलेक्ट्रॉनिक्स बोर्ड, डेपो मध्ये पाणी, उपहार गृह, फळे विक्रेत्यांना स्टॉल उपलब्ध करून देणे या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले जाणार आहेत. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..
मोबाईलवर मिळणार माहिती 
युरोपियन देशांच्या धर्तीवर बससेवा चालविली जाणार आहे. प्रवशांचा वेळ वाचविण्यासाठी प्रत्येक मार्गावरील बसचे लोकेशन, वेळ, स्थानकावर पोहोचण्याची वेळ, तिकिटाचे दर आदींबाबतची माहिती इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टम द्वारे उपलब्ध होणार आहे. बसेसचा लोगो व टॅगलाईन तयार झाली आहे. 
----कोट---- 
कोव्हीडच्या पार्श्‍वभूमीवर सध्या बसेसचे दर कमी ठेवले जाणार आहे. चार किलोमीटरला पाच रुपये असा दर जवळजवळ निश्‍चित झाला आहे.- कैलास जाधव, आयुक्त, महापलिका. 
----------- 
बससेवा सुरु झाल्यानंतर ती बंद करता येणार नाही त्यामुळे सर्व प्रकारच्या सुविधा पुर्ण करून प्रायोगिक तत्वावर काही बसेस सुरु केल्या जातील. तिकीटाचे दर सुरुवातीला कमी ठेवले जाणार आहे.- सतीश कुलकर्णी, महापौर. 
-----------