नाशिक : भूजल पातळी वाढविण्यासाठी पावसाळी जलपुनर्भरणाची सक्ती केली जात असली तरी महापालिका मुख्य कार्यालयासह जवळपास एक हजार ७५ मिळकतींवर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ ही म्हण महापालिकेच्या बाबतीत खरी ठरली आहे. पर्यावरणप्रेमींनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी सर्व इमारतींसाठी पावसाळी जलपुनर्भरणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
सिमेंटच्या इमारती, पेव्हर ब्लॉक, काँक्रिट व डांबरी रस्ते, विंधन विहिरी आदींमुळे पावसाचे पाणी जमिनीत न झिरपता नद्या, नाल्यांवाटे वाहून जात आहे. परिणामी भूजल पातळी कमी होण्याबरोबरच उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. जमिनीत पाणी मुरत नसल्याने पर्यावरणाचा धोका अधिक वाढत असल्याने पावसाळी जलपुनर्भरणाची सक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत नवीन बांधकामांना परवानगी देताना पावसाळी जलपुनर्भरण बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु ज्या महापालिकेतून आदेश काढले जातात, त्याच त्यांच्याच स्वमालकीच्या इमारतींमध्ये अशा प्रकारची सुविधा नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. महापालिका उपसमितीच्या बैठकीत पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी आयुक्त जाधव यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट
गोदावरी संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त
गोदावरी प्रदूषणासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी ७०३०३००३०० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. प्रोजेक्ट गोदाअंतर्गत गोदावरी नदीकाठी उभारण्यात येत असलेली आरसीसी भिंत ‘निरी’च्या सूचनेनुसार बांधावी, चेहडी व पंचक मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, गोदावरी नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून देखरेख ठेवण्यासाठी ३० पोलिस शिपाई, चार पोलिस उपनिरीक्षकांची नेमणूक करणे, औद्योगिक क्षेत्रातील नदी-नाल्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणाऱ्यांवर एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने संयुक्त कार्यवाही करावी, प्लॅस्टिक पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.
हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..