महामार्ग रुदीकरणासाठी शेकडो वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल! वृक्षप्रेमींकडून संताप 

सटाणा (जि.नाशिक) : महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली नामपूर ते सटाणा या राज्य आणि ताहाराबाद ते सटाणा या राष्ट्रीय महामार्गावरील तीन ते चार पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या हजारो वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाला सावली देणाऱ्या जुन्या आणि डेरेदार वृक्षांवर यांत्रिक कटर चालवून झाडे जमीनदोस्त करण्यात आल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

पाच पटीने वृक्षलागवड करून घेण्याची मागणीही

पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन साधण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून गावागावांत वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणने तालुक्यात २५ हजार वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाचे काम हाती घेतले आहे. विविध सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन वृक्षलागवडीसाठी जनजागृतीही केली जात आहे. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली संबंधित विभाग नामपूर-सटाणा राज्य आणि ताहाराबाद ते सटाणा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या शेकडो वर्षे जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमी नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने जितके वृक्ष तोडले, नियमानुसार त्याच्या पाच पटीने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेण्याची मागणीही वृक्षप्रेमींनी केली. सोमवारी (ता. ८) शहरातील नामपूर रस्त्यावरील जिजामाता हायस्कूलसमोरील जुने वृक्ष तोडण्यात आले. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

झाडे तोडल्याच्या बदल्यात प्रत्येक झाडामागे नव्याने पाच झाडे लावून ती जगविली पाहिजेत असा नियम आहे. संबंधित विभागाने किमान सटाणा शहर हद्दीत नव्याने झाडे लावून ती जगवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू. 
-प्रा. शांताराम गुंजाळ, सहसंयोजक, महाराष्ट्र संयुक्त वनव्यवस्थापन समिती 

सध्या ज्या पद्धतीने शहर हद्दीतील झाडे तोडली जात आहेत, ते पाहता शहराच्या पर्यावरणावर निश्चितपणे दुष्परिणाम होणार आहे. सध्या उन्हाळ्याला सुरवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांतील कडक उन्हाळ्यात तोडण्यात आलेल्या वृक्षांचे महत्त्व समजणार आहे. 
-राजेंद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

नामपूर- सटाणा-कळवण-वणी या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सटाणा पालिका क्षेत्रातील रस्त्यावर रुंदीकरणाआड येणारी झाडे तोडण्याची रीतसर परवानगी सटाणा वनपरिक्षेत्र आधिकाऱ्यांकडून घेतली आहे. त्यामुळे ही अवैध वृक्षतोड म्हणता येणार नाही. 
- वाय. ए. पाटील, सा. बां. उपअभियंता, उपविभाग, नांदगाव