महामार्ग वाहतुकीसाठी मागीतली १० हजारांची लाच; महिला फौजदारासह शिपायावर गुन्हा 

नाशिक : मालवाहतूकदार संघटनेच्या अध्यक्षाच्या ३५ वाहनांच्या महामार्ग वाहतुकीसाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ओझर पोलिसांत सहाय्यक निरीक्षक वर्षा कदम आणि पोलिस नाईक उमेश सानप यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तक्रारदार सचिन जाधव (३७, आडगाव) यांचा एक्स्ल ट्रान्स्पोर्ट, नाशिक आणि विराज रोड लाइन या नावाने ट्रान्स्पोर्ट व्यवसाय आहे. त्यांच्या गाड्यांची महामार्ग पोलिसांकडून अडवणूक होऊ नये, यासाठी महिला फौजदार वर्षा कदम आणि नाईक उमेश सानप यांनी दहा हजारांची लाच मागितल्याची  जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पंचासमक्ष त्यांनी लाचेची मागणी केल्याने सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा कदम व पोलिस नाईक उमेश सानप (दोघेही नेमणूक महामार्ग पोलिस केंद्र, पिंपळगाव बसवंत) यांच्याविरोधात ओझर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, शनिवारी (ता.२०) मालवाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व अंजू सिंघल, दिलीपसिंह बेनीवाल आदींनी पत्रकार परिषद घेऊन या मार्गावर जिल्ह्यातील पाच हजारांहून आधिक मालवाहतूकदारांना सुमारे २० लाखांची लाच द्यावी लागते. महामार्ग पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यासह शहर-ग्रामीण पोलिस अशा कुणाचीही लाचखोरी यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती