नााशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूकीचा जोर उत्तरोत्तर वाढत असला तरी, महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स नाशिककरांची उत्कंठा वाढविणारा ठरत आहे. दररोज नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत येत असले तरी, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न कायम आहे. या नावांमधील बरीच नावे बळजबरीनेच पुढे केली जात असल्याने, लोकसभा निवडणूकीसाठी तो उमेदवार खरोखरच सक्षम आहे काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरच उपस्थित करीत आहेत.
महाविकास आघाडीने आपला अधिकृत उमेदवार देण्यात आघाडी घेतली असली तरी, ऐनवेळी उमेदवार बदलल्यानेे नाशिककरांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. सुरुवातीला मविआकडून विजय करंजकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. त्यांनी प्रचाराचा नारळ देखील फोडला होता. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करीत, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली गेली. सुरुवातीला राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारीस नकार दिला होता, मात्र पक्षाआदेशापुढे त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. अशीच काहीशी परिस्थिती महायुतीमध्येही बघावयास मिळत आहे. महायुतीकडून प्रारंभी अनेकांची नावे चर्चेत होती. तर काहींची नावे बळजबरीनेच पुढे केली गेली. नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्याचवेळी भाजप इच्छुकांची नावेही पुढे येत होती. मात्र, या इच्छुकांची सक्षमता लक्षात घेता, भाजपला मतदार संघ सोडल्यास त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उभे करणे पक्षाला परवडणार काय? असा सवाल त्यावेळी उपस्थित केला गेला. अशात आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची नावे पुढे आली. मात्र, यातील एकानेही लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास फारसे स्वारस्य दाखविले नसल्याने, महायुतीचा उमेदवार कोण? हा सवाल कायम राहिला.
हा सर्व गोंधळ सुरू असतानाच जिल्ह्यातील हेवीवेट नेतृत्व मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अचानकच समोर आले अन् गोंधळात आणखीनच भर पडली. आश्चर्य म्हणजे उमेदवारीबाबत स्वत: भुजबळच अनभिज्ञ असल्याचे त्यांनीच मान्य केले. ‘माझे नाव दिल्लीतून फायनल झाले’ असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. तोपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गट नाशिक लोकसभेत तिकिटाच्या रेसमध्ये महायुतीकडून तळाच्या क्रमांकावर होता. दरम्यान, महायुतीतील उमेदवाराच्या गोंधळाचा सिलसिला अद्यापही कायम असून, भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता असतानाही शिवसेना शिंदे गटासह, भाजपकडून नवे नावे समोर येणे सुरूच आहे. अशात महायुती उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार, याबाबतची कमालिची उत्सुकता नाशिककरांमध्ये बघावयास मिळत आहे.
आज घोषणा शक्य
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने राज्यातील सर्व जागांची घोषणा करीत, जागा वाटपावरून आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आता महायुतीकडून देखील बुधवारी (दि.१०) राज्यातील सर्व जागांची घोषणा करून जागा वाटपातील तिढा सुटल्याचे दर्शविले जाऊ शकते. असेे झाल्यास, नाशिक लोकसभेच्या रिंगणात महायुतीकडून कोण असेेल? हे कोडे सुटण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळांना उमेदवारी?
मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्यानंतर मराठा समाजासह महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदार संघात नव्याने सर्वेक्षण करून नव्या उमेदवाराची चाचपणी केली. मात्र, या सर्वेक्षणात देखील भुजबळांचेच नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. अशात छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार काय? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा:
- तेलसाठ्याने ऊर्जा सुरक्षा वाढणार
- न्हावरे येथे पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा : चौघांना अटक
- Narayangaon : तमाशापंढरीत चार ते पाच कोटींची उलाढाल..!
The post महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा appeared first on पुढारी.