
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शेतकरी हा आपल्या शेतीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने भातशेती धोक्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्षातून एकदाच भातशेती करतात. आधीच गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेला होता. त्यात आता पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे ही सुकत चालली असून, अजून दोन ते तीन दिवस पाऊस पडला नाही तर उभे भातपीक हे सुकून जाईल, अशी भीती शेतकरीवर्ग व्यक्त करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्माही पाऊस पडलेला नाही.
काही ठिकाणी विहिरींना पाणी आहे. मात्र, शेतीला पाणी देण्यासाठी वीजच नसते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग केले जात असल्याने विहिरीत पाणी असूनही शेतपिकाला पाणी भरता येत नसल्याने आता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेती करताना पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. मात्र, त्या तुलनेने शेतपिकाला बाजारभाव मिळत नाही. अल्पशा प्रमाणावर पडलेल्या पावसावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातपिकाची लागवड केली आहे. मात्र, आता पावसाने ओढ दिल्याने शेतातील उभी पिके सुकून जात आहेत. शासनाने नाशिक जिल्हा दुस्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील टाकेद, साकूर, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी पिंपळगाव डुकरा, वाडीवऱ्हे आदी भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. शेतीत लागवड केलेली पिके पावसाअभावी सुकून चालली आहेत. शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल. म्हणून शासनाने काही तरी उपाय करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन दिलासा देणे गरजेचे आहे.
— पांडुरंग वारुंगसे, शेतकरी तथा माजी पं. स. सभापती
हेही वाचा :
- Climate Change : हवामान बदलामुळे येत्या शतकात १ अब्ज लोकांच्या अकाली मृत्यूची शक्यता! अभ्यासकांचा दावा…
- Kakrapar Nuclear Power Plant : गुजरातच्या काक्रापार येथे भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कार्यान्वित
- पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार! आता लक्ष ‘कालवा समिती’च्या बैठकीकडे
The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक appeared first on पुढारी.