महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात; संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आज (दि. १०) पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून ‘आमदार किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार’ महाजन यांनी पोलिसांत केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषदेने आमदार किशोर पाटलांच्या या मुजोरीचा तीव्र शब्दात धिक्कार केला. किशोर पाटील यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. याचा राग मनात धरून आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपूर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर आमदारांनी शिविगाळचे समर्थन देखील केले होते. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात पत्रकारितेच्या जगतात उमटली होती. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली.

संदीप महाजन आज (दि. १०) रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असतांना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला, तो चौक पत्रकार महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. याच ठिकाणी महाजन यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली गेली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटल यांनीच आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

सत्य बातमी देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले असल्याचा आरोप एस.एम देशमुख यांनी केला आहे. पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख, धुळे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक अनिल चव्हाण, साक्री तालुका समन्वयक अंबादास बेनुस्कर पिंपळनेर, जेष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके यांचा यामध्ये समावेश आहे.

The post महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात; संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध appeared first on पुढारी.