नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहर पोलिस दलातील शिपाई पदाच्या ११८ आणि ग्रामीण दलात ३२ जागांसाठी बुधवार (दि.१९) पासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणीसाठी चेस्ट क्रमांकासोबत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा वापर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या धावण्याची अचूक वेळ नोंदविता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम झाल्यानंतर पोलिस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. राज्यभरात शहर पोलिस दलात ११८ जागांसाठी ७ हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर ग्रामीण दलात ३२ जागांसाठी ३ हजार २२५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत. शहर पोलिसांची मैदानी चाचणी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर पहाटे साडेपाचपासून सुरू होईल. तर ग्रामीण पोलिसांची चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानात होईल. दरम्यान, भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे. आर्थिक व्यवहार टाळावेत, कोणत्याही भूलथापा किंवा ओळखीचा वापर करू नये, अफवा पसरवू नयेत यासंदर्भात सूचना केल्या आहेत. जे उमेदवार गैरप्रकार करताना आढळतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही अधिकारी-अंमलदाराच्या परिचयातील व्यक्तीने भरतीसाठी अर्ज केलेला नसावा, याची दक्षता घेण्यात येत आहे. यासह ज्या अधिकारी-अंमलदारांना भरतीचे ओळखपत्र दिले आहे. त्यांनीच मैदानात बंदोबस्त व भरती कामकाजासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

बायोमॅट्रिक हजेरी

पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर व महिलांसाठी आठशे मीटर धावण्याची चाचणी होईल. त्यावेळी चाचणी पूर्ण केल्याची अचूक वेळ नोंद करण्यासाठी राज्यभरात उमेदवारांच्या ‘चेस्ट’ क्रमांकासोबत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ लावण्यात येत आहे. यासह ‘बायोमॅट्रिक’द्वारे उमेदवारांची हजेरी घेत ओळख पटविण्यात येईल. त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक होईल, असे पोलिसांनी सांगितले.

भरती प्रक्रियेचे पूर्ण रेकॉर्डिंग

भरती प्रक्रियेतील प्रत्येक क्षणावर नजर ठेवण्यासाठी मैदानावर तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच हँडीकॅम मार्फतही प्रक्रियेचे रेकॉर्डिंग होणार आहे. त्यामुळे नि:पक्षपातीपणे, खुल्या व मुक्त वातावरणात चाचणी होईल असा दावा पोलिसांनी केला आहे. अनुचित प्रकार टाळले जातील. तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे.

तातडीने निपटारा होईल

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अपिल करण्याची संधी असेल. वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने अपिलांचा निपटारा करतील. खबरदारी म्हणून वैद्यकीय पथकेदेखील तैनात केली आहेत. प्रत्येक चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. उमेदवारासमक्ष गुणांची नोंद करण्यात येईल. – चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय शहर.

गैरप्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त

पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची गर्दी लक्षात घेता व गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरात अधिकारी व कर्मचारी मिळून २५९ जणांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. तर ग्रामीणमध्ये सुमारे ५०० पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असतील.

रेकॉर्डिंग होणार

चाचणी होणाऱ्या मैदानावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच हँडीकॅममार्फतही रेकॉर्डिंग केले जाईल. उमेदवारांसाठी थांबण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार मैदानी चाचणी घेण्यात येईल. १०० मीटर धावण्यासाठी वॉटरप्रूप मंडप टाकण्यात आला आहे. – आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, ग्रामीण.

उमेदवारांसाठी पोलिसांच्या सूचना

हेही वाचा: