महावितरणचा आडमुठेपणा काही थांबेना; रात्री बल्बचा आधार घेऊन होतेय कांदा लागवड

मनमाड (नाशिक) : विहिरीत पाणी असूनही वीज वितरण कंपनीच्या भारनियमनाचा ‘शॉक’ सध्या शेतकऱ्यांना बसत असल्याने रात्री अंधारात बल्बच्या उजेडात कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे मजुरांची वानवा, तर दुसरीकडे हप्त्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करावी लागत असल्याने शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी ‘फ्यूज’ गेलाच, तर ते टाकायचे काम शेतकरी करतात.

भारनियमनामुळे शेतकरी अडचणीत

या वर्षी कांद्याच्या रोपाअभावी कांद्याच्या क्षेत्रफळात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी उळेदेखील टाकले. मात्र, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, धुके, रोगराई यामुळे रोपे खराब झाली. काहींनी दुबार, तिबार उळे टाकली आहेत. त्याचीदेखील वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नाही. काही शेतकरी विकत रोप आणून कांद्याची लागवड करीत आहेत. बाजारातील कांद्याचे भाव काहीही असले तरी कांदा येथील नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांचा कल अधिक दिसत असला तरी सध्या वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

रात्री अंधारात बल्बच्या उजेडात कांदा लागवड

परिसरात हप्त्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्री अंधारात बल्बच्या उजेडात कांदा लागवड करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत आहे. मात्र, भारनियमनाच्या चुकीच्या वेळेमुळे कांदा लागवड अडचणीत आली असून, यासाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे. वीज वितरण कंपनीतर्फे हप्त्यातील तीन दिवस रात्री दहा ते सकाळी सहा तर तीन दिवस दिवसा दहा ते सायंकाळी सहा यावेळेत भारनियमन होत आहे. यामुळे कांदा लागवड कशी करावी, असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. 

दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठ्याची मागणी

त्यातच मजुरांचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यात रात्रीच्या वेळी जोखीम पत्करून थंडीत लागवड करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पूर्ण वेळ वीजपुरवठा सुरू ठेवून शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबवावे, ज्या रात्री वीज असलेल्या वेळी शेतकरी शेतात विजेची व्यवस्था करून बल्ब लावून त्याच्या उजेडात कांदा लागवड करतात, तर कांदे लावणारी मजुरांची टोळी रात्रीच्या वेळी कांदा लागवडीला नकार देते. मात्र विजेअभावी अधिकची मजुरी देऊन अथवा घरातील सर्व मंडळी, नातेवाईक यांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना सध्या लागवड उरकावी लागत आहे. 

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहे. तीन दिवस दिवसभर, तर चार दिवस रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होतो. त्यामुळे कांदा लागवड रात्रीची करावी लागत आहे. कांदारोपाचे भाव गगनाला भिडले आहे. कांदालागवड केल्यावर लगेच पाणी भरावे लागते. शेतकऱ्याला रात्री पिकांना पाणी देताना विंचू, साप, लांडगे यापासून धोका आहे. सरकारने दिवसा वीजपुरवठा देऊन शेतकऱ्यांचे हाल थांबवावेत. - विजय दराडे, जिल्हा संघटक, किसान सभा  

हेही वाचा >  बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा