महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका! दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : कसबे सुकेणे व परिसरात महावितरणने थ्री-फेज वीजपुरवठा करण्यासाठी केलेले नियोजन चुकीचे असून, शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. येथील शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 

दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी 
महावितरणकडून प्रत्येक महिन्याला भारनियमनात बदल केला जातो. महावितरणच्या नियोजनानुसार सुकेणे परिसरासाठी सोमवार ते गुरुवार रात्रीचा आठ वाजून २० ते पहाटे सहा वाजून २० मिनिटे असा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. तर शुक्रवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी तीन हा थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. रात्री विजेचा कुठलाही वापर शेतकऱ्यांना करता येत नाही. सध्या थंडीचे दिवस व परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नाही. तर दिवसा सकाळी सात ते दुपारी तीन असा थ्री-फेज पुरवठा तीन दिवसच होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने दिवसा जास्तीत जास्त वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

महावितरणने शेतीसाठी थ्री फेज वीजपुरवठा करताना आठवडाभर किमान चार ते पाच तास तरी दिवसा वीज शेतकऱ्यांना देता येईल, असे नियोजन करावे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे हाल होणार नाही. - छगन जाधव, माजी सरपंच, कसबे सुकेणे 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश 

महावितरण शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसुली करण्याचा प्रयत्न करते. प्रसंगी शेतकऱ्यांची वीज खंडितही केली जाते. मात्र, थ्री फेज वीजपुरवठा करताना शेतकरी हिताचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिवसा वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. - प्रवीण जाधव, शेतकरी, कसबे सुकेणे