Site icon

महावितरणपुढे अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान, ग्राहकांचे होणार हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्यातील ३० वीज कामगार संघटना मंगळवारी (दि.३) मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेल्या आहेत. संपकाळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी सज्ज असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू शकतो.

शासनाच्या खासगीकरण धोरणाविरोधात महावितरणच्या ३० हून अधिक कर्मचारी संघटना संपावर गेल्या आहेत. जिल्ह्यातील (Nashik Mahavitaran) अधिकारी व कर्मचारीदेखील या संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका वीजवितरणाला बसण्याची शक्यता आहे. मात्र, अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

संपावेळी वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्यासाठी महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, नियमित कर्मचारीच संपावर असल्याने या कालावधीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी कंत्राटी व सेवानिवृत्त कर्मचारी किती फायदेशीर ठरतील, हे पुढील तीन दिवसांत स्पष्ट होईल. त्यामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो.

येथे साधावा संपर्क
ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत आहे. त्यावरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ , १९१२ व १९१२० यावर संपर्क साधावा. यासोबत नाशिक मंडळातील ग्राहकांनी ७८७५३५७८६१ या क्रमांकावर तसेच मालेगाव मंडळातील ग्राहकांनी ७८७५६५३९५२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा :

The post महावितरणपुढे अखंडित वीजपुरवठ्याचे आव्हान, ग्राहकांचे होणार हाल appeared first on पुढारी.

Exit mobile version