नाशिक : तब्बल नऊ महिन्यांहून अधिक काळानंतर वरिष्ठ महाविद्यालयांना सुरवात झाली असली, तरी सध्या परीक्षा अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. महाविद्यालये बंद असली, तरी ऑनलाइन अध्ययन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सत्र पद्धतीने विविध परीक्षा घेण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरले जात आहेत. नियमित शुल्कासह २५ फेब्रुवारी, तर विलंब शुल्कासह २८ फेब्रुवारीची मुदत आहे.
कोरोना महामारीमुळे मार्चमध्ये वरिष्ठ महाविद्यालये बंद होती. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली होती. मात्र, वरिष्ठ महाविद्यालये मात्र बंदच होती. पालक- विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीनंतर सोमवार (ता. १५)पासून वरिष्ठ महाविद्यालयांना सुरवात झाली. आता विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह विधी, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश सर्व अभ्यासक्रमांसाठी नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत आहे, तर विलंब शुल्कासह २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
परीक्षांवर पुन्हा कोरोनाचे सावट
गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. सध्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवर लॉकडाउन करण्याबाबत विचार केला जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा कोरोनाचा फैलाव झाल्यास, यंदाच्या परीक्षाही प्रभावित होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय