महासभेत गोंधळ घालण्याचा विरोधकांचा डाव महापौरांनी उधळला; कोरोनात सहकार्याचे केले आवाहन

नाशिक  : कोरोना संसर्गामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमधील बेड फुल्ल झाले आहेत. शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतानाच आता ऑक्सिजन तुटवड्याचे संकट उभे राहिले. या पार्श्‍वभूमीवर महासभेत सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला घेरण्याची व्यूहरचना आखलेल्या विरोधकांचा डाव महापौर सतीश कुलकर्णी यांनी उधळून लावून कोरोना महामारीत प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून, त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत महासभा गुंडाळली. 

फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे तहकूब करण्यात आलेली महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता. ९) बोलाविली होती. ऑनलाईन सभेत धोरणात्मक व सदस्यांच्या विकासांचे विषय होते. प्रारंभी श्रद्धांजलीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मागील दोन महिन्यांत सभा न झाली नाही.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब

अडचणीत आणण्यापेक्षा सहकार्य करा

या दरम्यान कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. कोरोना संसर्ग वाढण्यास प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रभाग समित्या तसेच निवेदनांच्या माध्यमातून विरोधी पक्षांकडून झाला आहे. मागील आठवड्यात बेड मिळत नसल्याने एका रुग्णाने सामाजिक कार्यकर्त्यांसह महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. काही खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे, तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक लूट, शहरी आरोग्य केंद्रांवरील लसींचा तुटवडा आदी सर्वांचा जाब प्रशासनाला विचारून कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांची होती. मात्र, कोरोना काळात प्रशासनाकडून चांगले काम होत असून, अडचणीत आणण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत महापौर कुलकर्णी यांनी सदस्यांचे विषय मंजूर करत धोरणात्मक विषय तहकूब केले. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना, प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यामुळे संकटाच्या काळात खच्चीकरण होण्याएवजी सहकार्य करावे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक