महिनाभराची झुंज अखेर संपली! गॅस स्फोटात भाजलेल्या त्या महिलेस मृत्यूने गाठलेच; परिसरात हळहळ

सिडको (नाशिक) : घरात मुलाच्या लग्नाची तयारी सुरु.. भावाच्या लग्नासाठी विवाहीत बहिण घरी आलेली, अगदी पहाटेच्या वेळी नातवास भुक लागली म्हणून महिलेने दूध गरम करण्यासाठी गॅस पेटवला आणि क्षणात भयंकर स्फोट झाला..

नेमके घडले असे की, तब्बल एक महिन्यापूर्वी खुटवडनगर भागातील धनदाई कॉलनीत असलेल्या देवकी बंगल्यात गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता.  या घटनेत चार जण जखमी झाले होते. तेव्हापासून मृत्यूशी झुंज देत होत्या मात्र पुष्पाताई पगार यांना अखेर मृत्यूने गाठलेच. त्यांच्या मृत्यूमुळे परिसराच शोककळा पसरली.

स्फोटात कोसळल्या होत्या घराच्या भिंती

सकाळी सातच्या सुमारास पुष्पा बळीराम पगार (वय ५२) सकाळी नातवाला दूध गरम करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. गॅस सुरू करण्यासाठी गेले असता, गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला. यात त्यांच्यासह पती बळीराम पगार (५६), मुलगा अतुल पगार (२७) व नातू रूहान (२) जखमी झाले होते. हा स्फोट इतका भयंकर होता, की घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीच्या काचा फुटल्या तसेच घराचे टॉयलेट बाथरूमच्या भिंती कोसळल्या होत्या.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

धगधगत्या ज्वाळांतून काढले होते बाहेर

 गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाला तेव्हा त्याचा आवाज बॉम्बस्फोटासारखा भयंकर मोठा होता. आवाज ऐकून समोरच राहत असलेल्या सविता पिंगळे (वय ४२) यांनी जिवाची पर्वा न करता धावत जात बंगल्यातून पुष्पा पगार यांना धगधगत्या ज्वाळांतून रग टाकून बाहेर काढले. आपल्या घरात नेऊन त्यांच्या अंगावरील सर्व कपडे कात्रीने टराटरा फाडले व स्वतःच्या घरातील गाऊन घातला होता. 

घरात सुरु होती मुलाच्या लग्नाची तयारी 

मुलाच्या लग्नासाठी विवाहित मुलगी घरी आली होती. मुलीच्या मुलगा रूहान रडू लागल्याने त्याला दूध गरम करण्यासाठी पुष्पा धनगर स्वयंपाक घरात गेल्या होत्या. मात्र, रात्री गळतीमुळे स्वयंपाक घरात गॅस पसरला होता. त्यामुळे हा स्फोट झाला होता. दरम्यान, ठरल्याप्रमाणे नाईलाजास्तव त्यांच्या मुलाचे लग्न ९ जानेवारीला साध्या पद्धतीने पार पडले. पुष्पा पगार या घटनेत ८० टक्के भाजल्याने त्या मृत्युशी झुंज देत होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल