महिनाभरातच कोरोना पॉझिटिव्हचा दर दुप्पट! विविध रुग्णालयात खाटांच्या स्थितीचा आढावा 

नाशिक : कोरोना रुग्णवाढीचा दर जानेवारीत शंभर दिवसांचा होता. मात्र फेब्रुवारीत हाच दर आठ दिवसांवर आला आहे. शंभर रुग्णांमागे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

रुग्णालयात खाटांची स्थिती 
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून, तीस टक्के रुग्ण कोविड सेंटर व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात एकूण पाच हजार कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी सहाशे रुग्णांवर रुग्णालयांमध्ये, तर उर्वरित रुग्ण होम आयसोलेशन करण्यात आले आहेत. महापालिका व खासगी रुग्णालये मिळून तीन हजार २८४ खाटा आहेत. त्यापैकी दोन हजार ९५७ खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या ५१५ पैकी ४१४ खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजन बेड एक हजार २८८ पैकी एक हजार ९५ शिल्लक आहेत. व्हेटिलेटर बेड २७१ पैकी २४१ रिक्त आहेत. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

सध्या पाच हजार लस उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त जाधव म्हणाले, की गेल्या वर्षी महापालिकेतर्फे मेपासून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडून त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले होते. त्यामुळे आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासणीसाठी पन्नास हजार किट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी ज्या लोकांचा अधिक संपर्क होतो, त्यात कामगार, रिक्षाचालक, दुकानदार, सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. अशा लोकांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. कोव्हिशील्डच्या पन्नास हजार लसींची नोंदणी शासनाकडे करण्यात आली असून, सध्या पाच हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. 

सर्दी, खोकल्याच्या औषधे विक्रीला बंदी 
सर्दी, खोकला व ताप आल्यानंतर नागरिक मेडिकलमध्ये जाऊन तात्पुरत्या स्वरूपात औषधे घेऊन वेळकाढूपणा करतात. त्यामुळे आता मेडिकलमध्ये अशा औषधांसाठी नागरिक आल्यास त्यांना औषधे विक्रीस बंदी घालण्यात आली असून, उलट रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

आपत्कालीन कक्ष स्थापन 
नियमांचे पालन होत नाही तसेच कोविड रुग्णांची माहिती लपवून ठेवली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने तातडीने कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आला आहे. (०२५३- २३१७२९२, ९६०७४ ३२२३३, ९६०७६, २३३६६) या क्रमांकावर तक्रार किंवा मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.