महिनाभरात अठराशे शेतकऱ्यांचीच मका खरेदी; साडेसात हजार वेटिंगवर

येवला (नाशिक) : ज्या हमीभावाच्या खरेदीवरून दिल्लीत आंदोलनाचा प्रकोप सुरू आहे, ती हमीभावाची खरेदी निव्वळ फसवणूक असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. मका खरेदीला मर्यादित उद्दिष्ट दिल्याने जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक हजार ८२३ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली आहे. मका खरेदी अचानक बंद झाल्याने प्रतीक्षेतील सात हजार ४१९ शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

केंद्र शासनाने उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जातो; पण त्यासाठी अनेक निकष असून, खरेदीचे देण्यात येणारे उद्दिष्ट हा अडचणींचा विषय ठरत आहे. खासगी बाजारात अकराशे ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटलचा भाव असताना एक हजार ८५० रुपये शासकीय हमीभावाने मका खरेदी होत असल्याने जिल्ह्यात मका विक्रीला तोबा गर्दी होत आहे. यासाठी २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाल्यानंतर अक्षरश: रांगा लावून नावनोंदणी झाल्याने जिल्ह्यात तब्बल नऊ हजार २४२ इतक्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. शेतकऱ्यांचे विक्रीसाठी नंबर आल्यानंतर एकच गर्दी होते. किंबहुना दोन ते तीन दिवस खरेदी केंद्रात मुक्कामाचीही वेळ आली. परंतु क्विटलमागे ५०० रुपयांहून अधिक फायदा होणार असल्याने शेतकरी अडचणींवर मात करत मका विक्री करत होते.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

अचानक पोर्टल बंद झाल्याने शेतकरी वाऱ्यावर​

जिल्ह्यात साधारणतः १५ ते २० नोव्हेंबरनंतर मका खरेदी सुरू झाली असून, राज्याचे चार लाख ४९ हजार क्विंटलचे उद्दिष्ट १६ तारखेपर्यंतच पूर्ण झाले आहे. या काळात जिल्ह्यात अवघ्या एक हजार ९२३ शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण होऊ शकल्याने खरेदीची प्रक्रिया संथ असल्याचे दिसते. मुळात जिल्ह्यात मका हे प्रमुख पीक म्हणून पुढे येत असून, यंदा सर्वाधिक क्षेत्रावर मकापीक घेतल्याने उत्पादनही वाढल्याने नाशिकसाठी खरेदीचे उद्दिष्ट अधिक द्यायला हवे. परंतु राज्यासाठी एकच उद्दिष्ट असल्याने ते पूर्णत्वास गेले आहे. परिणामी, बुधवारी (ता.१६) पाचपासून पोर्टल बंद होऊन खरेदी बंद आहे. रब्बीच्या खरेदीतही असेच प्रकार झाल्याने उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. 

पैसे झाले अदा 
पहिल्या टप्प्यात खरेदी झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ८३७ शेतकऱ्यांना मक्याचे पैसेही मिळाले असून, या शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा कोटी ३७ लाख रुपये जमा झाल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी होते की नाही, याविषयी चिंता लागली आहे.  

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

अशी खरेदी... अशी प्रतीक्षा... 
खरेदी केंद्र - ऑनलाइन नोंदणी शेतकरी संख्या - खरेदी झालेले शेतकरी - पैसे मिळालेले शेतकरी 
सिन्नर - ११६४ - ३०८ - १९३ 
येवला - १४१२ - ३२८ - १८२ 
लासलगाव - १०८३ - २६८ - ०० 
चांदवड - १०७६ - १८१ - ५६ 
मालेगाव - १२५१ - २६३ - १२३ 
सटाणा - ८०९ - १३७ - ७८ 
नामपूर - ३९९ - २३ - १९ 
देवळा - ११३१ - १५९ - १२२ 
नांदगाव - ९१७ - १५६ - ६४ 
एकूण - ९२४२ - १८२३ - ८३७ 

भरड धान्य खरेदीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, या काळात मार्केटिंग फेडरेशनला राज्यात तीन लाख ४९ हजार क्विंटलचे उद्दिष्ट नेमून दिले होते. खरेदीचे हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबली आहे. यापुढे शासनाने मर्यादा व खरेदी कालावधी वाढवून दिल्यास खरेदी करणे शक्य होईल. 
-विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक