महिलांनी घेतला दुर्गावतार! संसार अन् युवा पिढीसाठी आक्रमक पाऊल; कळमणे ग्रामपंचायतीत अभियान

मनखेड (जि.नाशिक) : इतिहासही साक्ष आहे की, महिलांनी ठरवले तर त्या त्यांच्या संसाराला अन् युवा पिढीला वाचविण्यासाठी वेळ प्रसंगी दुर्गेचा अवतारही घेतात. असेच काहीसे चित्र सुरगाणा तालुक्यातील कळमणे ग्रामपंचायतीत पाहायला मिळाले.

गावठी भट्टया उद्ध्वस्त ; साधनेही नष्ट
सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात कळमणे ग्रामपंचायत येथील महिलांनी संसाराला, तसेच युवा पिढीला व्यसनापासून वाचविण्यासाठी कंबर कसत आक्रमक पाऊल उचलले. कळमणे ग्रामपंचायतमधील कळमणे, कचूरपाडा, भेगुसावरपाडा, सायळपाडा, वांगणपाडा, खिरमाणी, मधळपाडा आदी गावांत फेरी काढून दारूबंदीची जोरदार घोषणाबाजी केली. गावठी भट्टया उद्ध्वस्त करून साहित्याची मोडतोड करण्यात आली. यात डब्बे, मडके, पातेली, पंचपात्री, लाकडीनळी, फळी, बाटल्या, ड्रम आदी दारू गाळण्यासाठीची साधनेही नष्ट करण्यात आली. या दारूबंदी मोहिमेत सरपंच उर्मिला गावित, प्रमिला भोये, इंदू भोये, संगीता गवळी, मोहना गवळी, हिरा भोये, योगिता गवळी, प्रमिला जाधव, मंजुळा वाघमारे, इना गवे, भीमा गोतुरणे, मैना भोये, गीता गवळी, तसेच गावातील महिला बचतगट, अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

रणरागिणींचे कौतुक 
रणरागिणी आखाड्यात उतरल्यामुळे तळीरामांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कळमणे ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी गावठी दारूचे अड्डे चालू असून, ते तातडीने बंद करण्यात यावे, असे कळमणे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच उर्मिला गावित व ग्रामसेवक एस. टी. बागूल यांच्या सहीचे निवेदन बाऱ्हे पोलिस ठाण्याला देण्यात आले. जे शासनाच्या यंत्रणेला जमले नाही ते कळमणे ग्रामपंचायतीच्या महिलांनी करून दाखवले. त्यामुळे सर्वच स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

तंटामुक्त गावासाठी दारूमुक्त अभियान

सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात कळमणे ग्रामपंचायतीत संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे, यासाठी सोमवारी (ता. ११) सरपंच उर्मिला पांडुरंग गावित यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी दुर्गावतार धारण करत तंटामुक्त गावासाठी दारूमुक्त अभियान राबविले.