महिला पोलीस पाटील तिसऱ्या अपत्यामुळे अपात्र! मानधन वसुलीचा प्रांताधिकाऱ्यांचा फर्मान; चर्चेला उधाण

इगतपुरी (नाशिक) : तिसऱ्या अपत्याचा जन्मदाखला उपलब्ध नसताना अंगणवाडी सेविकेकडील माहितीच्या आधारे महिला पोलिसपाटील अपात्र घोषित करण्यात आले आहे. तालुक्यातील मायदरा धानोशी येथील ही घटना असून, जिल्ह्यात पोलिसपाटलाला अपात्र करण्याची ही पहिलीच घटना आहे.

तिसऱ्या अपत्याचा जन्माचा दाखला उपलब्ध नाही
इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे पोपट पांडुरंग केकरे यांनी तक्रार दाखल केली होती. याबाबत दोन्ही पक्षकारांना वाजवी संधी देऊन न्यायिक कामकाज पार पाडण्यात आले. तिसऱ्या अपत्याचा जन्मदाखला उपलब्ध नसताना अंगणवाडी सेविकेकडील माहितीच्या आधारे महिला पोलिसपाटील संगीता केशव केवारे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. तालुक्यातील मायदरा धानोशी येथील ही घटना असून, जिल्ह्यात पोलिसपाटलाला अपात्र करण्याची ही पहिलीच घटना आहे.पोलिसपाटील यांचे पती केशव केवारे हे पत्नीच्या कामकाजात हस्तक्षेप करून गावातील वाद सोडविण्याऐवजी वादामध्ये वाढ करतात, असेही तक्रारीत नमूद केले होते.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

तालुक्यात चर्चेला उधाण

उपविभागीय अधिकारी, तेजस चव्हाण यांनी निवाड्याचे कामकाज सुरू केले. तहसीलदार इगतपुरी, मंडळ अधिकारी टाकेद बुद्रुक, आरोग्यसेविका अडसरे बुद्रुक, वैद्यकीय अधिकारी खेड आदींचे चौकशी अहवाल कामकाजात नोंदविण्यात आले. तिसऱ्या अपत्याचा जन्माचा दाखला आढळत नसल्याबाबत ग्रामसेवकांनी जबाब नोंदविला. मायदरा येथील अंगणवाडीसेविका श्यामा केवारे यांचा जबाब आणि त्यांच्याकडील घरपोच आहार वाटपाच्या रजिस्टरवरून पोलिसपाटील संगीता केशव केवारे यांना तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात पोलिसपाटील अपात्र होण्याची ही पहिलीच घटना असून, तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.  

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा