महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत पुढे ढकलली; राज्यपालांच्या दौऱ्यामुळे निर्णय

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या दौऱ्यामुळे बुधवारी (ता. ३) होणारी महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत दोन दिवस पुढे ढकलली आहे. आता शुक्रवारी (ता. ५) आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. 

जिल्ह्यात नुकत्याच ६२१ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुका, प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायतींवर सरपंचपदासाठी महिला आरक्षण पडते, याकडे लक्ष लागून होते. मात्र, राज्यपाल बुधवारी जिल्हा दौऱ्यावर असल्याने संबंधित आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

५ फेब्रुवारीला महिला आरक्षणाची सोडत

उमराणे आणि येवल्यातील कातरणी ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदांसाठी लिलाव झाल्याने येथील निवडणूक कार्यक्रम आयोगाने रद्द केला आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसह २०२५ पर्यंत मुदत संपणाऱ्या ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले होते. त्यानंतर बुधवारचा मुहूर्त महिला सरपंचपद आरक्षणासाठी निवडण्यात आला होता. परंतु राज्यपालांच्या दौऱ्यामुळे आता ५ फेब्रुवारीला महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित प्रांताधिकारी कार्यालयात ती काढण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक विभागाने कळविले आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच