मांसाहारी खवय्यांनो! ब्रॉयलर कोंबड्यांच्या भावात घसरण; ख्रिसमसच्या सुट्यांकडे उत्पादकांची नजर 

नाशिक : कोरोना विषाणू संसर्सागाच्या काळात अफवांचा बाजार सुरु झाल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचा उद्योग रसातळाला गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेतल्याने किलोचा भाव ९५ रुपयांच्यापुढे पोचला होता. थंडीला सुरवात होताच, खप वाढेल व चांगले भाव मिळतील, अशी आशा उत्पादकांना होती. पण, गेल्या महिन्यानंतर किलोला १७ रुपयांनी भाव घसरुन आता किलोचा भाव ७८ रुपयांवर पोचला आहे. 

ब्रॉयलर कोंबड्यांच्या भावात किलोला घसरण 
राज्यात थंडीमध्ये महिन्याला साडेचार कोटी ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन होते. आता हेच उत्पादन ३ कोटी ६० लाख कोंबड्यांचे आहे. उत्पादित होणाऱ्या कोंबड्या खपल्या जात आहेत. तरीही भाव न मिळण्याचे कारण काय? याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी प्रामुख्याने हॉटेलिंग व्यवसाय सुरु झाला असला, तरीही त्यात ब्रॉयलर कोंबड्यांच्या खपाचे प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत असल्याचे प्रमुख कारण पुढे आले. कारखानदारी-उद्योग व्यवसाय सुरु झाले असले, तरीही इतर राज्यातील कष्टकरी पूर्वीच्या प्रमाणात अद्याप राज्यात पोचले नसल्याने ब्रॉयलर कोंबड्यांची मागणी आणखी वाढू शकलेली नाही. इतर राज्यातील कष्टकरी या महिन्याच्या अखेरीस राज्यात येतील आणि ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने हॉटेलिंग व्यवसायातील खप शंभर टक्क्यांपर्यंत पोचेल या अपेक्षेने कोंबड्या उत्पादकांची नजर सध्या सुट्यांकडे खिळली आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

पिल्लांची चढ्या भावाने खरेदी 
ब्रॉयलर कोंबड्यांना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ९५ रुपयांहून अधिक किलोचा भाव मिळाल्याने उत्पादकांनी थंडीतील मागणीच्या पार्श्‍वभूमीवर चढ्या भावाने पिल्लांची खरेदी केली. ब्रॉयलर कोंबड्यांचा उद्योग मंदीच्या गर्तेत सापडल्याने पिल्लांच्या कोंबड्या शेतकऱ्यांनी विकून टाकल्या. त्यातच, पिल्लांसाठी लागणाऱ्या अंड्यांचे उत्पादन थंडीत कमी होत आहे. परिणामी, पिल्लांची किंमत वाढली. सर्वसाधारणपणे २५ रुपयांमध्ये पिल्लू मिळणे अपेक्षित असताना आता ४५ रुपये मोजावे लागतात. शिवाय मक्याचा भाव क्विंटलला चौदाशे रुपये असल्याने खाद्यासाठी किलोचा भाव २८ रुपये झाला आहे. आपसूक ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च किलोला ७२ ते ७३ रुपयांपर्यंत पोचला आहे. उत्पादकांच्यादृष्टीने समाधानाची बाब म्हणजे, उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव ब्रॉयलर कोंबड्यांना मिळतो आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

डिसेंबरच्या अखेरीस चिकनचा वापर मोठ्याप्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. थंडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मांसाहारावर भर दिला जातो. सध्यस्थितीत थंडीने जोर धरला असल्याने ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस चिकनला वाढत जाईल, असे वाटते. - उद्धव आहेर, आनंद ॲग्रो समूह