माध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन थेट वैयक्तिक खात्यावर; पंधरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ 

दाभाडी (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन आता जिल्हास्तरावरून थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया वेतनपथक माध्यमिककडून आगामी महिन्यापासून राबविण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच विनाअडथळा वेतन वर्ग करण्याचा प्रयोग नाशिक वेतनपथक (माध्यमिक) राबविला जाणार आहे.

वेतनपथकाचा राज्यात पहिलाच प्रयोग; पंधरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ 

यात नाशिक जिल्ह्यात ९३४ खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील १५ हजार कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पद्धतीने वेतन वर्ग होणार आहे. विद्यमान कार्यप्रणालीनुसार वेतनपथकाकडून मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर कर्मचाऱ्यांची वेतन रक्कम वर्ग होते. ही रक्कम त्या-त्या शाळांतील मुख्याध्यापक अधीनस्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतात. नव्या प्रयोगात आता कर्मचाऱ्यांची वेतन रक्कम थेट वैयक्तिक खात्यावर आणि प्राप्तिकर, सोसायटी कर्ज हप्ता, विमा आदी तत्सम कपातींची रक्कम मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

वेतनपथक आणि आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठांनी या प्रक्रियेच्या अंतिम पूर्तता पूर्ण केल्या आहेत. त्रुटी पूर्ततेसाठी जिल्ह्यातील शाळांकडून कर्मचाऱ्यांची बँक खातेनिहाय माहिती मुख्याध्यापकांच्या शालार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. ही योजना राबविल्याने कर्ज हप्ते परतफेडीसह विनिमय वेळेत होणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

ट्रेझरी, वेतनपथक, संबंधित बँक, मुख्याध्यापक संयुक्त खाते आणि नंतर कर्मचारी खाते असा कालापव्यय संपून आता वेतनाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याची कार्यवाही स्वागतार्ह आहे. वेतनपथकाच्या निर्णयाने कर्मचारी सुखावले आहेत. - शशांक मदाने, शिक्षकनेते, नाशिक 

 हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

खातेदार कर्मचाऱ्यांना पीएफ स्लिप ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर डीसीपीएसच्या स्लिप्सही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता वेतन रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आगामी महिन्यापासून वर्ग करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. आगामी महिन्यात संबंधित वेतन अनुदान सर्व कर्मचाऱ्यांच्या खातीच जमा करण्यात येईल. -उदय देवरे, अधीक्षक, वेतनपथक कार्यालय, नाशिक