मानवतेचे हात मातृत्व जोपासतात तेव्हा! तीन तास मरणयातना; डॉक्टरांचेही कसब पणाला

चांदवड (जि. नाशिक) : दुपारी अडीच-तीन वाजताची वेळ.. उन्हाच्या तडाख्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये चतकोर भाकरीचा शोध सुरू असतांनाच तिला प्रसूतीपूर्ववेदना सुरू झाल्या. काही संवेदनशील नजरांनी ही गोष्ट हेरली... मग सुरु झाला लढा प्लास्टिक आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन)मुळे धोक्यात आलेलं तीचं मातृत्व वाचविण्याची धावपळ.. 

चांदवड शहरात (ता. ७) रोजी भाकर-तुकड्याच्या शोधात भटकणाऱ्या मोकाट गाईला कडाक्याच्या उन्हात भरदुपारी प्रसूतीपूर्व वेदना सूरु झाल्या. अगोदरच प्लास्टिक अन् शिळ्या भाकरीवरचं आयुष्य त्यात शरीरात पाण्याचीही कमतरता असल्याने तिचं नैसर्गिकरित्या प्रसूत होणं कठीण होतं. ही गोष्ट लक्षात येताच ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा  रिंकू भूषण कासलीवाल यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांसह पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव आहेर यांना ही माहिती कळवली. 

धावपळ तब्बल तीन तास चालली 

डॉ. वैभव आहेर व नागरिकांनी जवळ जाताच गाईने त्यांच्यावर  हल्ला चढवला. असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी तेथून पळ काढला. मात्र बराच वेळ देऊनही वासरू अर्ध बाहेर, अर्ध आत अशा अवस्थेत मरणाच्या दारात अडकलेलं असल्याने डॉ. वैभव आहेर, पियुष नहार, पशुधन पर्यवेक्षक वसंत वाळुंज, श्याम जगताप, जनार्दन जाधव, गोविंदराव झारोळे यांनी जोखीम पत्करून गाईला बांधले. डॉक्टर व पशुधन पर्यवेक्षक यांनी तातडीने गाईवर उपचार करत तब्बल तीन तासांनी गोंडस वासराला सुखरूप बाहेर काढले. भावना व जोखमीच्या हिंदोळ्यावर तीन तास चाललेला हा थरार अखेर गाईच्या सुखरूप प्रसूतीने संपला! या सगळ्या घटनाक्रमात डॉक्टर अन् संवेदनशील माणसांचं कसब मात्र पणाला लागलं..

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

मोकाट जनावरांचे आरोग्य प्लास्टिक कचरा व तत्सम गोष्टी खाल्ल्याने धोक्यात आहे, सोबतच तपमानात दिवसेंदिवस वाढ होत असून पिण्याचे पाणी देखील जनावरांना उपलब्ध होत नसल्याने विविध व्याधी जडत आहेत. सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी पाणपोईसाठी समोर येण्याची गरज आहे. सोबतच प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून  जनावरांच्या पोटात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. वैभव विश्वासराव आहेर,
पशुधन विकास अधिकारी(गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चांदवड

कवी रवींद्र देवरे म्हणतात...

सृजन पवित्र आहे मात्र त्याहून पवित्र आहे मातृत्व. त्यासाठी मानवतेच्या डोळ्यातून करूणा वाहते.. हाच खरा धर्म हेच खरे कर्म.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल