सिडको : ‘पुढारी’ वृत्तसेवा
‘पुढारी’ न्यूज चॅनलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून विशेष एलईडी व्हॅनचा प्रवेश गुरुवारी (दि. 18) नाशकात झाला. त्याचा औपचारिक शुभारंभ सकाळी सिडकोतील उत्तमनगर चौकात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या नंतर सिडको भागातील चौकात नागरिकांनी ‘पुढारी’ न्यूज एलईडी व्हॅनचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उपाध्यक्ष उमेश कोठावदे, खजिनदार गोविंद झा, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शेंडे, सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. कुशारे, पवननगरस्थित के.बी.एच. विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश देवरे यांच्यासह ‘पुढारी’ नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आणि युनिट हेड राजेश पाटील उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे मराठी न्यूज चॅनल होईल
समाजातील अन्याय, अत्याचाराविरोधात चळवळ उभी करणाऱ्या दैनिक ‘पुढारी’प्रमाणे ‘पुढारी’ परिवाराचे ‘पुढारी’ न्यूज हे चॅनल सर्व सामान्यांचे होणार आहे. राज्यात ते प्रथम क्रमांकाचे मराठी न्यूज चॅनल ठरेल, असा विश्वास आयमाचे अध्यक्ष ललित बुब आणि अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शेंडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी संजय भामरे, दिनेश बोरसे, महेश चव्हाण, प्रकाश गुजर, शशी गरुड, सचिन अहिरे, राजेंद्र मराठे, रणजित राजपूत, विनोद पाटील, राज खैरनार आदींसह नागरिक उपस्थित होते. ‘पुढारी’चे वितरण उपव्यवस्थापक शरद धनवटे आणि सिडको प्रतिनिधी राजेंद्र शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
न्यूज चॅनल अल्पावधीत प्रेक्षक पसंतीस
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी १९३९ मध्ये स्थापन केलेल्या दैनिक ‘पुढारी’चा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह गोवा आणि बेळगावमध्ये विस्तार झाला आहे. काळानुरूप बदल घडवत ‘पुढारी’ने वाचकांची खऱ्या अर्थाने भूक भागवली. आज ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या पुढाकाराने ‘पुढारी’ न्यूज चॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियात दमदार पाऊल टाकले. ‘पुढारी’ न्यूज चॅनल अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, ‘पुढारी’ न्यूजची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही विशेष एलईडी व्हॅन करण्यात आल्याचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी यावेळी सांगितले.