मार्चअखेरपर्यंत बांधकामांना ऑफलाइन परवानगी; वादग्रस्त ऑटो-डिसीआर प्रणाली रद्द

नाशिक : जुन्या विकास नियंत्रण नियमावली संपुष्टात आल्याने राज्य शासनाने ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात, ऑटो-डीसीआर संगणक प्रणाली बंद करून नवीन नियमावलीचा समावेश करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे. 

बांधकाम व्यवसायिकांना दिलासा

३ डिसेंबर २०२० पासून राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका, पालिका व नगर परिषदांसाठी एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीला मंजुरी दिली आहे. नव्या नियमावलींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यात एफएसआय वाढविण्याबरोबरच सामासिक अंतराच्या नियमात बदल केला आहे. पार्किंगच्या नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी बदल केला आहे. नव्या नियमावलीनुसार झालेली आज्ञावली संगणक सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे अपर सचिव किशोर गोखले यांनी दिल्या आहेत. नाशिक शहरासाठी २०१७ मध्ये नवीन शहर विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आली होती. त्या वेळी ऑफलाइन बांधकाम परवानग्यांवर फुली मारत ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिमनुसारच परवानगी देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी महापालिकेने ऑटो-डीसीआर सॉफ्टवेअर विकसित केले होते. परंतु, अचूक मोजमाप होत असल्याने नियमात असूनही बांधकाम परवानगीचे प्रस्ताव धुडकावून लावले जात होते. विशेष म्हणजे एकदा रद्द केलेला प्रस्ताव पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये लोड करण्यासाठी स्वतंत्र फी अदा करावी लागत होती. त्यामुळे ऑनलाइन परवानगीला बांधकाम व्यावसायिक कंटाळले होते. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ऑटो-डीसीआर रद्द 

ऑटो-डीसीआरचे काम पुणेस्थित एका कंपनीला देण्यात आले होते. कंपनीचे प्रतिनिधी मनमानी करत असल्याच्या तक्रारी होत्या. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कंपनीचे प्रतिनिधी व क्रेडाई मेट्रो व वास्तुविशारदांची एकत्र बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला होता. परंतु, त्यानंतही कामकाजात सुधारणा न झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना मनस्ताप व महापालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. आता ऑटो-डीसीआर प्रणाली बंद करण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा