मार्चअखेरपासून नाशिक-कोलकाता विमानसेवा; स्पाइस जेटतर्फे बुकिंग सुरू

नाशिक : दिल्ली, हैदराबाद, पुणे अहमदाबाद, बेंगळुरूपाठोपाठ नाशिकमधून कोलकाता या मेट्रो शहरात विमानसेवा २९ मार्चपासून सुरू होणार असून, त्यासाठी स्पाइस जेटतर्फे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. दिल्ली सेवा सध्या आठवड्यातून चार दिवस आहे. १ एप्रिलपासून दररोज सेवा सुरू केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. 

दिल्लीसाठी  सात दिवस उड्डाण

अलायन्स एअर कंपनीतर्फे अहमदाबाद, हैदराबाद, पुणे स्पाइसजेट कंपनीतर्फे दिल्ली, पुणे, बेंगळुरू, तर ट्रुजेट कंपनीतर्फे अहमदाबाद, तर स्टार एअरवेज कंपनीतर्फे बेळगाव हवाई सेवा सध्या सुरू आहे. आता नाशिकच्या हवाई सेवेचा आणखी विस्तार होत असून, कोलकाता हे महत्त्वाचे औद्योगिक शहर जोडले जाणार आहे. स्पाइस जेट कंपनीतर्फे सोमवार ते शनिवार असे सहा दिवस २९ मार्चपासून सेवा सुरू होईल. सध्या दिल्लीसाठी आठवड्यातून चारदा उड्डाण होते. मात्र, आता सोमवार ते रविवार असे सात दिवस उड्डाण होईल. १ एप्रिलपासून दिल्ली हवाई सेवेचा विस्तार होईल. नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी काही दिवसांत महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अंतर्गत व बाह्य कनेक्टिव्हिटी नाशिकमध्ये वाढत असल्याचे यानिमित्त स्पष्ट होत आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

नाशिकमधून कोलकाता शहराला जोडणारी हवाईसेवा सुरू होणार असल्याने दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबादपाठोपाठ आणखी एक मेट्रो शहर नाशिकशी जोडले जाणार असून, त्याचा उद्योग-व्यवसायासाठी नक्कीच फायदा होईल. 
-मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, नाशिक 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले