मालमत्ता करातील व्याजात सूट; मालेगाव मनपा स्थायी समितीचा निर्णय 

मालेगाव (नाशिक) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात २२ मार्च २०२० पासून तीन महिन्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. या काळातील लॉकडाऊनमुळे शहरातील अर्थकारणाला मोठा फटका बसल्याने येथील बहुसंख्य भाग झोपडपट्टी व कामगारांचा असल्याने मालमत्ता करातील व्याजात सुट देण्याचा निर्णय गुरुवारी (ता.१०) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र यासाठी मालमत्ता कर एकरक्कमी भरावा लागणार आहे. 

सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी चारला कॉन्फरन्स हॉलमध्ये स्थायी समितीच्या झालेल्या ऑनलाईन सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. सभागृह नेते अस्लम अन्सारी यांनी याबाबत भिवंडी-निजामपुर महापालिकेने मालमत्ता करात सुट देण्यासाठी अभय योजना राबविल्याची माहिती देत याबाबत मागणी केली होती. आयुक्त कार्यालयातर्फे हा प्रस्ताव चर्चेला येताच मंजुर करण्यात आला. दोन वेगवेगळ्या कामांचा अनामत रक्कम परत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

स्थायी समिती सदस्य सभेत..

प्रभाग क्रमांक २ मधील पथदीव्यांचे सर्व साहित्य वापरुन देखभाल व दुरुस्ती करण्याची (ऑन-ऑफ सह) आयकॉन इलेक्ट्रीकल्सची प्रतिपोल, प्रतिदिन ९७ पैसे या प्रमाणे १८ लाख ५८ हजार ५८० रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनासाठी ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंट या संस्थेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट या पदावर दरमहा अडीच लाख रुपये प्रमाणे ३१ मार्च २०२१ पर्यंत नियुक्ती देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षातील महसुली भांडवल उत्पन्न व खर्चास मान्यता देण्यात आली. शहरात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नाक्यावर ५० रुपये प्रतिवाहन बाजार फी वसुलीसाठी निविदेतील देकाराची फेरनिश्‍चिती करण्यासाठी गठीत झालेल्या समितीचा अहवाल मंजूर करण्यात आला. अंदाजपत्रकात डीके कॉर्नर ते सोयगाव मराठी शाळा या भुयारी गटारसाठी तरतूद करण्यात आलेली ५० लाख रुपये रक्कम टेहरे-सोयगाव चाैफुली येथे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नगरसचिव पंकज सोनवणे यांनी विषयांचे वाचन केले. उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव, लेखापाल कमरुद्दीन शेख आदींसह विभागप्रमुख, स्थायी समिती सदस्य सभेला उपस्थित होते. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

मालमत्ता कर, व्याजमाफी या प्रमाणे 

३१ डिसेंबर २०२० पर्यंत - १०० टक्के 
१५ जानेवारी २०२१ पर्यंत - ७५ टक्के 
१५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत - ५० टक्के 
२८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत - २५ टक्के 
२८ फेब्रुवारी नंतर करभरणा केल्यास व्याज रक्कमेत सवलत मिळणार नाही.