मालेगावचा भंगार बाजार पुन्हा गजबजला! उलाढालही समाधानकारक

मालेगाव (नाशिक) : स्वस्तात मस्त वस्तू मिळण्याचे हक्काचे ठिकाण असलेला मालेगावचा भंगार बाजार पुन्हा गजबजू लागला आहे. शहराबरोबरच खानदेशमधील नागरिक आवर्जून या बाजाराला भेट देत येथून वस्तू खरेदी करतात. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक उपकरणे, मोबाईल, चार्जर, बॅटरी आदींसह वाहनांशी निगडित व संसारोपयोगी वस्तूंची येथे रेलचेल आहे. बाजारात पन्नासपेक्षा अधिक दुकाने असून, दिवसभर ग्राहकांची वर्दळ दिसून येते. सध्या तरी भंगार बाजारातील उलाढाल समाधानकारक आहे.

भंगार बाजाराची पूर्वपदावर येण्यास आघाडी

किदवाई रोड ते मच्छीबाजारदरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावली जातात. कोरोनामुळे भंगार बाजारही मंदावला होता. बाजारात दिवसभर ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ असते. सायंकाळी व रात्री शहरातील ग्राहक बहुसंख्येने दिसतात. शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवशी बाजारात मोठी गर्दी असते. सध्या जुना मोबाईल, चार्जर, बॅटरी, मोबाईल कव्हर, हेडफोन, ब्लूटुथ आदी वस्तू घेण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे. दुकानांमधील वस्तू रस्त्यावरच मांडून खरेदी-विक्री होते. आलेला ग्राहक बाजारातून काहीतरी घेऊनच जातो. इतर बाजारपेठांपेक्षा भंगार बाजाराने पूर्वपदावर येण्यास आघाडी घेतली आहे.

मुंबईहून येतो माल

भंगार बाजारातील माल मोठ्या शहरातून येतात. यात मुंबईहून येणाऱ्या मालाची प्रमाण अधिक आहे. त्यापाठोपाठ सुरत येथून माल येतो. विक्रेते खोक्याप्रमाणे घाऊक भावाने खरेदी करून तो येथे विकत असतात. कोणत्याही वस्तूला वॉरंटी, गॅरंटी नसते. मोठी दुकाने व मॉलमध्ये मिळणार नाहीत अशा वस्तू येथे सहज व रास्त दरात उपलब्ध होतात. शेती व वाहनांशी निगडित असणाऱ्या अनेक वस्तू येथे मिळत असल्याने ग्रामीण ग्राहकांचा या बाजाराकडे मोठा कल आहे.

या वस्तू मिळतात भंगार बाजारात

एलईडी, टीव्ही, इस्त्री, दुर्बीण, टॅब, लॅपटॉप, होम थिएटर, स्मार्टफोन, मोबाईल, चार्जर, बॅटरी, ब्लूटुथ, मेमरी कार्ड, हेडफोन, पंखा, मर्क्युरी दिवे, प्रवासी बॅग, रंगीत बल्ब, आरामदायी खुर्ची, साधी खुर्ची, व्हॅक्युम क्लीनर, स्केटिंग बूट, साधे बूट, गॉगल, रेडिओ, मिक्सर, वीजपंप, फ्रीज, स्टीलची भांडी, घड्याळ, कपाट, मांडणी, स्क्रू चावी, टेस्टर, वाहनांचे पाने, हातोडा, पकड, टिकम, पावडी, विविध आवाजांचे वाहनांचे हॉर्न, वाहनांच्या बॅटरी, घरगुती इन्व्हर्टर.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

मुंबईहून माल आणतो. खरेदी भावापेक्षा दोन-पाच रुपये मिळाले तरी आम्ही वस्तू विकून टाकतो. वस्तू देताना त्याची गॅरंटी नसते. कारण खरेदी करताना आम्हीच तो भंगार भावाने घेतो. लॉट की कौन सी भी चीज हम मट्टी समझ के लाते है, और ओ हिसाब से बेचते है. - अब्दुल गफार, विक्रेते, भंगार बाजार, मालेगाव

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली