मालेगावच्या चिकन टिक्क्याची खवय्यांना भुरळ! रोज सुमारे दहा लाखांची उलाढाल 

मालेगाव (जि. नाशिक) : प्रत्येक शहराची खास अशी खाद्यसंस्कृती असते.  त्या-त्या शहरातील काही विशीष्ट पदार्थ हे त्या शहराची ओळखच बनलेले असतात आणि त्यांची चव चाखण्यासाठी लोक दूरदूरहून शहरात येतात. मालेगाव शहराची देखील अशीच वेगळी ओळख तयार झाली आहे. मालेगावचा चिकन टिक्का म्हणजे मांसाहारप्रेमींसाठी पर्वणी ठरत असून या पदार्थांची सर्वदूर स्वस्त, मस्त, जबरदस्त अशी प्रचीती आहे.

३० वर्षांपासून नागरिकांची पसंती

मालेगाव शहरातील विविध शाकाहारी, मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहेतच पण त्यातच मालेगावच्या चिकन टिक्क्याची खवय्यांना मोठी भुरळ पडली आहे. मालेगावचा चिकन टिक्का सर्वत्र प्रसिद्ध आहे. शहरात ३० वर्षांपासून चिकन टिक्क्याला नागरिक पसंती देत आहेत. प्रमुख हॉटेलसह शहरात दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी चिकन टिक्क्याची विक्री होते. यात रोज सुमारे दहा लाखांची उलाढाल होते. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

शहरात आलेल्या पाहुण्यांनाही भुरळ

पूर्व भागात चिकन टिक्का विक्री करणारी दुकाने मोठ्या संख्येने आहेत. येथे बालगोपाळांसह महिला व ज्येष्ठ नागरिक चिकन टिक्क्याला पसंती देतात. शहरात रोज दोन ते तीन हजार किलो चिकन टिक्क्याची विक्री होते. चिकन टिक्क्याला परिसरातील नागरिकही पसंती देतात. विशेषत: भट्टीच्या चिकन टिक्क्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावचे पाहुणे येथे आल्यास ते चिकन टिक्क्याची चव चाखल्याशिवाय जात नाहीत. शहरात १६० ते २०० रुपये किलोप्रमाणे चिकन टिक्का खवय्यांना तळून दिला जातो. यात विशेषत: चिकन टिक्का स्पेशल मसाला वापरून तयार केला जातो. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू होणारी दुकाने रात्री बारापर्यंत सुरू असतात. येथील नागरिकांना स्वस्त व लगेच उपलब्ध होणाऱ्या चिकन टिक्का खाण्यासाठी खवय्यांची धूम असते. 

एक हजाराहून अधिक जणांना रोजगार 

शहरात सध्या चिकनचे दर १३० रुपये किलो आहेत. त्यामुळे येथे तळून मिळणारे चिकन १६० ते २०० रुपये किलोप्रमाणे नागरिकांना मिळते. यातून एक हजाराहून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे. शुक्रवारी व रविवारी दुपटीने चिकन टिक्क्याची मागणी वाढते. या दोन दिवसांत पाच ते सहा हजार चिकन टिक्क्याची विक्री होते. मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्गात चिकनचे भाव कमी झाले असताना शहरात रोज दहा हजार किलोहून अधिक चिकन टिक्क्याची विक्री होत होती. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

२००६ पासून चिकन टिक्का विक्री व्यवसाय करीत आहे. खवय्ये आमच्याकडच्या विविध खाद्यपदार्थांमध्ये चिकन टिक्क्याला सर्वाधिक पसंती देतात. स्वस्तात आम्ही ग्राहकांना चांगल्या प्रतीचा टिक्का देतो. यात प्रामुख्याने चिकन रोस्ट, चिकन फ्राय, चिकन टिक्का स्पेशल असे विविध प्रकार आहेत. 
- शारीक अन्सारी, बाबा चिकन टिक्का सेंटर, मालेगाव