मालेगावच्या बर्फीची खवय्यांना भुरळ! हातगाड्यांवरील बर्फी पोहचली शहरा-शहरांत

मालेगाव (नाशिक) : शहर विविध वेगळ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या मिठाईसह अनेक पदार्थांचे आकर्षण शहरवासीयांना कायम असते. या गोड पदार्थांमध्ये फैनी शेवया, रोट, नानकटाई अशा अनेक पदार्थांची चव तोंडातच राहाते. अशा वेगवेगळ्या मिठाईंमध्ये मालेगावच्या बर्फीची खासियत अनेक शहरांपर्यंत पोचली आहे.

हातगाड्यांवरील बर्फीचा इतिहास पन्नास वर्षांचा

बर्फीचा इतिहास तब्बल पन्नास वर्षांचा आहे. विशेषत: दुधापासून बर्फी बनवली जाते. या बर्फी व्यवसायावर अनेक छोटे-मोठे व्यावसायिक उदरनिर्वाह करतात. शहराच्या मुख्य चौकांमध्ये हातगाड्यांवर सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असते. मिठाईच्या दुकानांवर रंगीबेरंगी बर्फीची सजावट केलेली असते. हातगाड्यांसह अनेक ठिकाणीची चवदार बर्फी बालकांना आकर्षित करते. दररोज एक हजार किलोपेक्षा अधिक बर्फी विकली जाते. त्यामुळे रोजच्या रोज दुधाचा खवा लावून बर्फी तयार करण्याकडे कल असतो. पाच लिटर दुधापासून दीड किलो बर्फी तयार होते. सकाळी तयार केलेली बर्फी रात्री बारापर्यंत खायला मिळते.

किलोला तीनशे रुपये सर्वसाधारण दर

आठवड्यातून येणारा शुक्रवार हा सुटीचा वार असल्याने छोटी ईद समजून या बर्फीला महिला, बाल गोपाळांसह ज्येष्ठ नागरिक पसंती देतात. कसमादे पट्ट्यासह ग्रामीण भागातील शहरात खरेदीनिमित्त आलेले नागरिक हमखास येथील बर्फी नेतात. किलोला तीनशे रुपये सर्वसाधारण दर असतो. किरकोळ विक्रेते दहा, वीस रुपयाप्रमाणे विक्री करतात. बर्फीचे शंभरपेक्षा अधिक चौकांत हातगाडी व स्वीट दुकानांवर बर्फी विकली जाते. बर्फीमध्ये काजू बर्फी, मलाई बर्फी, पिस्ता, अंजिर, मँगो, ड्रायफ्रूट, मिलन केक, स्पेशल केक बर्फी, अंडा बर्फी, काजू कतली, मावा खारी, मावा लाडू आदी प्रकार आहेत.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबाची बर्फी बनविण्याची परंपरा आहे. दिवसेंदिवस बर्फीचा गोडवा वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध करावे लागते. स्पेशल खवा बनविण्यासाठी स्वतंत्र कारागीर काम करतात. सर्वाधिक छोटे-मोठे विक्रेते आमच्याकडून बर्फीची खरेदी करतात. - ताहीर मलिक संचालक, राजू डेअरी, मालेगाव

यंत्रमाग कामगारांना शुक्रवारी सुटी असते. त्यामुळे अनेक जण नातेवाइकांकडे जातात. महिला व कुटुंबीय बर्फीला पसंती देतात. बाहेरगावाहून आलेले नातेवाइकांनाही बर्फीचा पाहुणचार आवडतो. - मोहंमद इम्रान, हाजी नूर स्वीट सेंटर