मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला गुजरातमध्ये भीषण अपघात; चौघे जागीच ठार

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगावच्या हजार खोली भागातील वऱ्हाडाच्या बसला गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला. अपघातात मालेगावच्या चाैघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज पहाटे झालेल्या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

शहरातील हजार खोली भागातून सुरतकडे लग्नासाठी वऱ्हाड  निघाले होते. आज (दि. ५)  दुपारी विवाह सोहळा होता. वऱ्हाडींची  भरधाव असेलली लक्झरी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात बस अर्धी कापली गेली. चौघांचा जागीच मृत्यू झाला.  खासगी लक्झरी बस अर्धी कापली गेल्याने अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सात गंभीर जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वालोदजवळ व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. मयत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. वालोद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. आर. वासावा व सहकारी घटनास्थळी पोहोचले होते.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल