मालेगावला अर्ज दाखलसाठी तोबा गर्दी! इच्छुकांच्या वाढत्या तक्रारींमुळे ऑफलाइन अर्जांनाही संमती

मालेगाव (नाशिक): तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता. २९) इच्छुकांची मोठी गर्दी झाली. दिवसभरात ६९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी आतापर्यंत ८४५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातच इंटरनेटची गती कमी, सर्व्हर अडचण आदींमुळे मोठा गोंधळ उडाला. 

तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप​

अर्ज दाखल करताना उमेदवारांची अक्षरश: दमछाक होत होती. कॅम्प रस्त्यावरील स्टेट बँक चौक ते छावणी पोलिस ठाणे या भागासह नवीन तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. परिसरातील वाहतूक यामुळे विस्कळित झाली होती. अखेर सायंकाळी कॅम्प रस्त्यावर वाहतूक नियमनासाठी पोलिस तैनात केले.

ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची संमती 

तालुक्यातील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सर्व अडचणींसंदर्भात वारंवार तक्रारी करत होते. राज्य निवडणूक आयोगाकडे थेट तक्रारी पोचल्याने उद्या अर्ज दाखल करून घेण्यासाठी वेळ वाढवून देतानाच पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) अर्ज स्वीकारण्यास राज्य निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला आहे. सायंकाळी उशिरा आलेल्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. बुधवारी (ता. ३०) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने दुपटीने अर्ज दाखल होतील. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

मंगळवारी ग्रामपंचायतीनिहाय दाखल अर्ज असे :

साकूर- ९, वळवाडे- ८, भिलकोट- १, चिंचावड- ६, गाळणे- ७, टाकळी- ११, घोडेगाव-३३, वडगाव- ६, राजमाने- १, तळवाडे- २०, वळवाडी- ८, हाताणे- ८, सवंदगाव- १४, सायने खुर्द- २, देवघट- १३, दापुरे- ९, कंधाणे- १४, दसाने- १०, गिगाव- २, कुकाणे- ८, चिंचवे- ५, निमगुले- १, खडकी- ३, कौळाणे गा.- ६, झाडी- १, मथुरपाडे- २, शेरूळ- ४, ढवळीविहीर- ६, पिंपळगाव- १, जळगाव निं.- ९, चोंढी- २, टेहेरे- ११, उंबरदे- २, वाके- १०, डाबली- १, दहिवाळ- ४, माणके- ३, लखाणे- १०, जळकू- ८, येसगाव बुद्रुक- ९, रोंझाणे- ६, दहिदी- १०, झोडगे- ३७, कोठरे बुद्रुक- ६, वडेल- ७, पाथर्डे- ३, नाळे- ४, शेंदुर्णी- १८, साकुरी निं.- ४, कजवाडे- ८, अजंग- १५, एरंडगाव- ४, रावळगाव- २७, आघार बुद्रुक- १२, वनपट- ७, टिंगरी- १३, चिखलओहोळ- १०, खायदे- ५, निमगाव खुर्द- १०, चंदनपुरी- २७, येसगाव खुर्द- ११, मेहुणे- ७, कौळाणे निं.- ५, लोणवाडे- १३, खलाणे- ४, विराणे- ५, खाकुर्डी- २१, सावकारवाडी- १३, मळगाव- ८, लेंडाणे- ७, अस्ताने- १८, जेऊर- २, घाणेगाव- १०, गारेगाव- ४, डोंगराळे- १०, भारदेनगर- २, निमशेवडी- ४, सिताणे- ४, कळवाडी- २६, नरडाणे-४. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

कॅम्प रोडवरील व्यावसायिकांना बूस्टर 

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कॅम्प रोड रस्त्यावरील इंटरनेट सेंटर, खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॅम्प वेंडर, झेरॉक्सचालक, हॉटेल, चहा, फळ विक्रेत्यांना गेल्या दोन दिवसांत मोठा व्यवसाय मिळाला आहे. या भागातील सर्व हॉटेले हाउसफुल होती. निवडणूक या व्यावसायिकांसाठी बूस्टर डोस ठरली आहे. मात्र याच मार्गावरील अन्य व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग, रहदारीचा अडथळा यामुळे काही प्रमाणात फटकाही बसला आहे.