मालेगावला ग्रामपंचायत मतदानाची तयारी पूर्ण! १ हजार ६८४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. गुरुवारी (ता. १४) तहसील कार्यालयाच्या आवारातून मतदानप्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी चारपर्यंत अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोचतील, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले. 

मतदान शांततेत पार पडेल..

९६ ग्रामपंचायतींच्या ३१७ प्रभागातून ७०८ उमेदवारांची नावे, चिन्हांसह मतदान यंत्रातील सीलिंगप्रक्रिया यापूर्वीच झाली. नूतन प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात साहित्य वाटपासाठी भव्य मंडप उभारला आहे. निवडणूकप्रक्रिया, मतदान शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणार आहे, असा विश्‍वास प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, राजपूत यांनी व्यक्त केला. पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस व गृहरक्षक दलातील जवान असतील. मोठी गावे व संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिस प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहेत. 

एकूण ३३५ मतदान केंद्रे

मतदान साहित्य वाटप, साहित्य व कर्मचारी पोचविण्यासाठी खासगी बस, जीप, टेम्पो, क्रूझर अशी १६० वाहने आरक्षित करण्यात आली आहेत. या वाहनांतून गुरुवारी (ता. १४) कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोचविण्यात येईल. एकूण ३३५ मतदान केंद्रे आहेत. ९६ ग्रामपंचायतींच्या ७०८ जागांसाठी एक हजार ६८४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २०८ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. एकूण ९९ ग्रामपंचायतींपैकी चोंढी, लखाणे व ज्वार्डी बुद्रुक या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७१ ग्रामपंचायतींच्या तर, वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. बंदोबस्तासाठी सुमारे चारशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

प्रचाराच्या तोफा थंडावल्या 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १३) सायंकाळी जाहीर प्रचार संपणार आहे. दोन दिवस गावोगावी विविध देवदेवतांच्या नावाने चिकन, मटणच्या जेवणावळी झडत आहेत. या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस असल्याने अनेक गावांमध्ये मतदारांना अखेरचा शिधा वाटप होणार आहे. विविध गावांमध्ये तरुण बहुसंख्येने नशीब अजमावत आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

निवडणूक तयारी दृष्टिपथात

मतदान केंद्रांची संख्या - ३३५ 
संवेदनशील मतदान केंद्र - चार 
निवडणुकीसाठी अधिकारी - १२२ 
मतदानप्रक्रियेतील कर्मचारी - २,०२१ 
निवडणुकीसाठी आरक्षित वाहने - १६०