मालेगावला विक्रीसाठी आलेल्या 40 तलवारी जप्त; तीन संशयितांना अटक, एक फरारी

मालेगाव (नाशिक) : शहरात विक्रीसाठी व गुन्हा करण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेल्या 40 तलवारींचा साठा अपर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला. या प्रकरणी तिघा संशयीतांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.

असा आहे प्रकार

मुंबई - आग्रा महामार्गावरील मड्डे हाँटेलजवळ सोमवारी (ता. 1) सायंकाळी केलेल्या कारवाईत तलवार रिक्षासह लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.
 अपर अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना काही तरूण शस्त्र विक्रीसाठी शहरात आणत असल्याची माहिती मिळाली होती. उपनिरीक्षक आर. के. घुगे यांच्या पथकाने मड्डे हाँटेलजवळ मोकळ्या मैदानात सापळा रचून रिक्षा (एमएच- 41 एटी 0907) जप्त केली. यावेळी मोहंमद आसिफ शाकीर अहमद, इरफान अहमद हबीब, अतीक अहमद सलीम (तिघे, मालेगाव) यांना अटक करण्यात आली. मोहंमद अब्दुल रशीद फरार झाला.

एक लाख आठ हजाराचा ऐवज जप्त

तिघांकडून 44 हजाराचा तलवार साठा, 50 हजाराची रिक्षा व सुमारे 14 हजाराचे दोन मोबाईल असा एक लाख आठ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.  घुगे, पोलिस शिपाई प्रकाश बनकर, संदीप राठोड, पंकज भोये, भूषण खैरनार आदींनी ही कारवाई केली. श्री. राठोड यांच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी संशयीताचा शोध सुरू आहे.