मालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा; दोनशे अतिरिक्त सिलिंडर देण्याची महापालिकेची मागणी 

मालेगाव (जि. नाशिक) : येथील रुग्णालयांना धुळ्यातील ठेकेदाराकडून होणारा ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. नाशिक येथून ट्रकमधून सिलिंडर मागविली जात आहेत. येण्या-जाण्यासाठी पाच तासांपेक्षा अधिक कालावधी लागत असून, येथे सिलिंडरची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. प्रशासनाने दोनशे अतिरिक्त सिलिंडर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी केली. 

येथील रुग्णालयांना धुळे येथील ठेकेदाराकडून सहा महिन्यांपासून ऑक्सिजन सिलिंडर पुरविली जात होते. हा ठेकेदार २४ तास सेवा देत होता. तसेच ने-आण वाहतूक खर्च व सिलिंडर भरणे, उतरविणे हेदेखील ठेकेदाराची माणसे करीत होती. महापालिकेचा तसा करार झाला होता. संबंधित ठेकेदाराला धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचे आदेश दिल्याने त्याने मालेगाव महापालिकेस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनेनुसार नाशिकहून येथे ऑक्सिजन सिलिंडर पुरविले जात आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

मालेगाव ते नाशिक अंतर तसेच संबंधित ठेकेदार रात्रीची सेवा देत नसल्याने येथे वेळेत सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. ने-आणचा खर्च व सिलिंडर भरणे, उतरविणे हे कामदेखील आरोग्य कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. येथे केवळ २४० सिलिंडर आहेत. बहुतांशी सिलिंडर रुग्णांना लावलेली असतात.ती रिकामी झाल्यानंतर भरण्यासाठी नेण्यात येतात. नाशिकहून सिलिंडर येथे पोचण्यास मोठा वेळ जात आहे. मालेगावसाठी दीडशे ते दोनशे अतिरिक्त सिलिंडर तातडीने उपलब्ध करून द्यावीत. धुळे येथून केवळ दोन तासांत सिलिंडरचे वाहन मालेगावला पोचते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुरेशी व्यवस्था होईपर्यंत धुळे येथूनच पुरवठा करावा, अशी मागणी डॉ. डांगे यांनी केली आहे.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ