मालेगावात काँग्रेसच्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; काँग्रेसला मोठा धक्का

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्तीगत कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पाठविल्याची माहिती त्यांनी सोमवारी (ता.८) येथे पत्रकार परिषदेत दिली. राजीनाम्याचे व्यक्तिगत कारण सांगितले असले तरी पक्ष सत्तेत असतानाही कामे होत नसल्याने ते नाराज होते. शेख राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

१५ दिवसानंतर अंतिम निर्णय

मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जात. शेख म्हणाले, की गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसमध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. १५ दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष

आसिफ शेख यांनी कॉंग्रसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाला मोठा फटका बसणार आहे. त्यांचे समर्थक व काही नगरसेवक त्यांच्या सोबतच अन्य पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आसिफ यांचे वडील माजी महापौर रशीद शेख काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या वरीष्ठ पातळीवरुन आसिफ शेख यांची मनधरणी करुन राजीनामा मागे घेण्याचे प्रयत्न होऊ शकतील.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

कशी आहे कारकीर्द

शेख यांनी १९९८ मध्ये त्यांनी यूथ काँग्रेसचे सचिव पद भूषविले. सन २००२ ते २०१२ पर्यंत ते काँग्रेसचे नगरसेवक राहिले आहेत. याच दरम्यान सन २००५ ते २००७ या कालावधीत ते महापौर झाले. २००७ ते २०१२ पर्यंत त्यांनी महापालिकेत गटनेता म्हणून काम पाहिले.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभव झाला.